भाविकांना मठाबाहेर काढला तर याद राखा,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संचार बंदी जाहिर केली असून मठामध्ये आश्रय घेऊन थांबलेल्या भाविकांना संध्याकाळ पर्यंत पंढरपूर सोडून बाहेर जाण्यास सांगितले आहे.
पोलिस प्रशासनाने असे अचानक फर्मान (आदेश)काढल्याचा आरोप करीत भाविकांना मठाबाहेर काढाल तर याद राखा असा इशारा ह. भ. प. बंडा तात्या कराडकर यांनी पोलिस प्रशासनास दिला आहे.
सकाळी ऍड. माधवी निगडे फाउंडेशन व वेणू गोपाल फाउंडेशन याच्या मार्फत मंदिर समितीला 2 ई रिक्षा भेट देण्यात आल्या.
या कार्यक्रमानंतर कराडकर पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना बंडा तात्या कराडकर म्हणाले की, माघी यात्रेचा एकादशी चा मुख्य सोहळा दि.२३ रोजी साजरा होत आहे.
या अनुषंगाने भाविक अगोदरच पंढरपूर येथील मठात दाखल झालेले आहेत.
जिल्हा प्रशासनाने उशिरा संचार बंदी जाहीर केली आहे.
पोलीस प्रशासनाने मठाधिपती ना नोटीस देऊन संध्याकाळ पर्यंत मठ रिकामे करा अन्यथा गुन्हे दाखल करू अशा इशारा दिला असल्याने भाविकांची तारांबळ उडाली आहे.
याची दखल घेत पंढरीत आलेल्या भाविकांना मठातून बाहेर काढाल तर परिणाम वाईट होतील, असा इशारा हभप बंडातात्या कराडकर यांनी दिला असून यामुळे वारकरी विरुद्ध पोलीस प्रशासन असा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर व परिसरातील १० गावात दि. २२ रोजी रात्री 12 ते दि. २३ रोजी रात्री १२ पर्यंत २४ तास संचार बंदी लागू करण्यात आली आहे.
मंदिर समितीने दि. २२ व २३ रोजी दोन दिवस मंदिर बंद ठेवले आहे.
त्यामुळे एकही भाविक कुठल्याही मठात राहणार नाही यासाठी पोलिसांनी मठ चालकांना गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
त्यामुळे वारकरी, भाविक आणि मठ चालक यांचा गोंधळ उडाला आहे.
प्रशासनाने वेळीच निर्णय न घेतल्याने वारकरी, भाविक पंढरीत आले होते आणि ऐनवेळी प्रशासनाने आपली ही भूमिका जाहीर केली.
प्रशासनाने निर्णय घेण्यास विलंब केल्याने समाजमाध्यावरही टीका होत असताना आता ह.भ.प बंडातात्या कराडकर यांनी शासन आणि पोलीस प्रशासनास सणसणीत चपराक लगावत कडक इशाराच दिला आहे.
कोरोनाबाबत काळजी घेतली पाहिजे हे आम्हालाही मान्य आहे .
पण प्रशासनाने आधीच हा निर्णय जाहीर करायला हवा होता.
समाजाच्या आरोग्याची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे हे मान्य आहे.
पण पंचमीपासून प्रयेक मठात वारकरी येऊन राहिलेले आहेत.
त्यांना जर आता पोलीस प्रशासन हुसकाउन काढत असतील तर ते योग्य नाही.
संचारबंदी करायचीच होती तर पंचमीपासूनच वारकरी पंढरीत येऊ द्यायला नको होते.
कार्तिकी, आषाढी यात्रेवेळी तसे केलेच होते पण आता वारकरी मठात आलेले आहेत,
अशा वेळी त्यांना बाहेर काढणे हे मात्र आम्हाला मान्य नाही.
असेही कराडकर महाराज यांनी सांगितले.
पोलिस प्रशासन भाविकांना मठातून बाहेर काढण्याचे जे सत्र सुरु केले आहे ते त्वरित थांबवावे अशी आम्ही विनंती करीत आहोत.
मठाच्या बाहेर पडू नका असं बंधन घालायलाही हरकत नाही,
संचारबंदी पाहिजेच या मताचा मी नाही, पंढरपूर येथे जेवढी गर्दी आहे त्यापेक्षाही अधिक गर्दी पुण्या मुंबईच्या बाजारात आहे, नेत्यांचे मेळावे होत आहेत,
सगळीकडेच गर्दी आहे.
त्यामुळे वारकरी संप्रदायालाच जाचक अटी असू नयेत, त्याचबरोबर नाथ षष्ठी आणि तुकाराम बीज या उत्सवालाही शासनाने आडकाठी आणू नये असा आमचा आग्रह आहे.
वारकरी संख्येला मर्यादा घालायलाही हरकत नाही, ती मर्यादा आम्ही जरूर पाळू, पण वारकरी वर्गाचा प्रक्षोभ होईल अशी कोणतीही ताठर भूमिका पोलिसांनी घेऊ नये, वारकरी संतापेल अशी कोणतीही भूमिका घेऊ नये.
जर आम्ही मठातील वारकरी बाहेर कडून एकत्र जमा केले तर शासनाच्या अंगलट येईल असा रोकठोक इशाराही ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे.


No comments:
Post a Comment