Breaking

Saturday, 11 December 2021

विशेष प्रतिनिधी /महादेव गाडे - भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात येणार.


भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा करणार

पुणे : भीमा कोरेगाव शौर्य दिन येत्या एक जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. याठिकाणी अभिवादनासाठी येणाऱ्या भीम अनुयायांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू झाल्याची माहिती भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्यावतीने देण्यात आली.गतवर्षी कोरोनामुळे उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. यंदा कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, याबाबत भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने बैठका घेण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये तहसीलदार आणि सहायक पोलिस आयुक्त यांच्यासमवेत इतर सर्व विभागाचे अधिकारी आणि आंबेडकर समाजातील पक्ष संघटनांची संयुक्त बैठक नुकतीच पार पाडली. या वेळी जिल्हा आणि पोलिस प्रशासनाकडून पिण्याचे पाणी, पार्किंग, वाहतूक सुविधांची माहिती देण्यात आली.
हेही वाचा: हवेली पोलीस ठाण्याच्या तक्रार निवारण दिनाला प्रतिसाद ; 35 अर्जांची निर्गती
भीमा कोरेगांव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर यांच्यासह इतर राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. यावर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहून सरकारच्यावतीने अभिवादन करावे, याबाबतचे निमंत्रण भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्यावतीने देण्यात आले आहे. सर्व राजकीय पक्षाच्या अभिवादन सभा, आंबेडकरी साहित्य विक्रीचे स्टॉल याचाही कार्यक्रमात समावेश राहणार आहे. दरम्यान, भीमा कोरेगाव विजयस्तंभाचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी या वेळी केली.

No comments:

Post a Comment