Breaking

Sunday, 21 February 2021

मुंबई शहर प्रतिनिधी/ विशाल खडके- जागृती, दक्षता, खबरदारी वाढविल्यास कोरोना प्रसार निश्चित कमी होईल...राज्यपाल.


जागृती, दक्षता व खबरदारी वाढविल्यास करोना प्रसार निश्चित कमी होईल - राज्यपाल
 
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, वित्तीय संस्था, कॉर्पोरेटस व व्यापार संस्थांच्या प्रमुखांचा सत्कार

एलआयसी, युटीआय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय अध्यक्ष व प्रमुखांचा सत्कार

शेफ संजीव कपूर, अभिनेत्री परिझाद झोराबियन देखील सन्मानित
 
    मुंबई - करोना महामारी देशासाठी परीक्षा पाहणारा काळ होता. गेल्या वर्षभरात देशाने करोनाचा मुकाबला उत्तम प्रकारे केला आहे. परंतु, करोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी निरंतर जागृती, दक्षता व पुरेशी खबरदारी घेतल्यास करोनाचा नव्याने होणारा प्रसार निश्चितपणे नियंत्रणात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.  
      भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी कैसर खालिद यांनी स्थापन केलेल्या ‘पासबान ए अदब’ या संस्थेतर्फे शनिवारी (दि.२०) राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात आयोजित करोना योद्ध्यांच्या सत्कार सोहळ्यात राज्यपाल बोलत होते. 
    यावेळी करोना काळात संस्थात्मक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सार्वजनिक उपक्रम, वित्तीय संस्था, कॉर्पोरेटस, उद्योग समूह व सेवाभावी संस्थांच्या अध्यक्ष तसेच प्रमुखांचा आणि वैयक्तिक करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
    भारतातील लोकांमध्ये सर्वसाधारण काळात अनेक विषयांवर मतभिन्नता आढळते. परंतु संकट प्रसंगी सर्व लोक आपापसातील मतभेद विसरून एकत्र येतात, हे करोना काळात अधोरेखित झाले. येथील लोकांमध्ये सेवाभाव व कारुण्यभाव विपुल आहे. त्यामुळे करोनासारखी कितीही संकटे आली, तरीही सेवाभाव व करुणा या गुणांमुळे ते नामशेष होतील, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. देशात दानशूर व्यक्तींची व संस्थांची कमी नाही, हे देखील या काळात दिसून आल्याचे राज्यपालांनी सांगितले.        
    यावेळी कैसर खालिद यांनी करोना काळात पासबान ए अदब संस्थेने केलेल्या मदत कार्याची माहिती दिली. आल्केम ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष बी. एन. सिंह यावेळी उपस्थित होते.
     राज्यपालांच्या हस्ते यावेळी शेफ संजीव कपूर, अभिनेत्री परिझाद झोराबियन, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष इम्तियाजुर रहमान, न्यू इंडिया अश्युरंसचे अध्यक्ष अतुल सहाय, भारतीय जीवन  विमा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विपिन आनंद, सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष पल्लव महापात्रा, आयडीबीआयचे संचालक सुरेश खातनहार यांसह ५० करोना योद्ध्यांचा यावेळी शाल व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment