आरोग्य विभागाच्या ७५ ग्रामीण रुग्णालयात आता डायलिसीस सेवा !
राज्यात मूत्रपिंड विकाराचे रुग्ण वेगाने वाढत असून मोठ्या प्रमाणात यातील रुग्णांना डायलिसिस सेवेची गरज असते.
ग्रामीण भागात पुरेशा संख्येने डलिसीस केंद्र नसल्याचे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आता ७५ ग्रामीण रुग्णालयांच्या ठिकाणी डायलिसीस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे ८० हजाराहून अधिकवेळा डायलिसीस करता येणार आहे.
ग्रामीण भागातील मूत्रपिंड विकार ( किडनी) रुग्णांसाठी ही योजना जीवनदायी ठरणारी आहे.
गेल्या दोन दशकात देशात व महाराष्ट्रात मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून मधुमेह व रक्तदाबामुळे मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे.
यातील अनेकांना मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे डायलिसीस करण्याशिवाय अन्य पर्याय राहात नाही.
मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांना एकतर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा एक पर्याय आहे किंवा डायलिसीस करावे लागते.
प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी येणारा खर्च मोठा असतो.
प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंड मिळणे ही अवघड बाब असून डलिसीस हा त्याला एक पर्याय आहे.
डायलिसीस सेवा ही प्रामुख्याने शहरी भागात तसेच जिल्हा पातळीवर उपलब्ध असून ग्रामीण भागातील रुग्णांचे यात खूप हाल होताना दिसतात.
साधारणपणे रुग्णाला आठवड्यातून तीन वेळा तीन तासासाठी डायलिसीस करावे लागते व एकावेळच्या डायलिसीसाठी खाजगी रुग्णालयात १२०० रुपये ते २५०० रुपये खर्च येतो.
बहुतेक रुग्णांना हा खर्च परवडणारा नसल्यामुळे आरोग्य विभागाने २०१३ पासून २३ जिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसीस सेवा सुरु केली.


No comments:
Post a Comment