नऊवारीत 6 हजार फुट उंचीवरून उडी मारून तिरंग्याला सलामी, मराठमोळ्या शीतल महाजनचा पराक्रम
स्कायडायव्हिंग या साहसी खेळामध्ये विक्रमांचे इमले रचणारी मराठमोळी पॅराशूट जम्पर शीतल राणे-महाजन हिने 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला.
पॅरामोटरमधून तब्बल 6 हजार फूट उंच उड्डाण करून पॅराशूटच्या सहाय्याने स्कायडायव्हिंग करत शीतलने तिरंगा ध्वजाला खणखणीत सलामी देत मानवंदना दिली.
नऊवारी साडी नेसून पॅराशूट जम्प
हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरच्या मैदानावर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता शीतल राणे-महाजन हिने हा उपक्रम केला. आकाशी रंगाच्या नऊवारीतील शीतलने निळ्या आकाशातून 6 हजार फुट उंचावरून पॅराशूट जम्प केले, तेंव्हा उपस्थित मोजक्या प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला. तरीही दबक्या टाळ्यांच्या आवाजात उपस्थितांनी शीतलच्या जिगरबाज वृत्तीला सलाम केला. दीड मिनिटांच्या या थरारक उडीचा प्रवास 'याचि देही याचि डोळा' बघण्यासारखा होता. शीतलची ममता महाजन या जीव मुठीत धरून लेकीच्या पराक्रमाची झेप बघत होत्या. शीतलचे लँडिंग होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या पुणेकर कन्येचं कौतुक केलं. नऊवारी नेसून स्कायडायव्हिंग करणारी मी देशातील पहिली खेळाडू आहे. त्यामुळे हा एक प्रकारे राष्ट्रीय विक्रमचं होय, असेही शीतल महाजन म्हणाली.


No comments:
Post a Comment