Breaking

Saturday, 27 November 2021

विशेष प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - दक्षिण आफ्रिकेत आधिक संसर्ग क्षमता असलेला कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्याने जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले.


मुंबई - दक्षिण आफ्रिकेत अधिक संसर्ग क्षमता असलेला करोनाचा नवा प्रकार आढळून आल्यामुळे जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांकही शुक्रवारी तीन टक्‍क्‍यांनी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे 7.35 लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 1,687 अंकांनी कोसळून 57,107 अंकांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 509 अंकांनी कोसळून 17,026 अंकावर बंद झाला. इंडसइंड बॅंक, मारुती, टाटा स्टील, एनटीपीसी, बजाज फायनान्स, एचडीएफसी, टायटन या कंपन्यांनी सपाटून मार खाल्ला. मात्र या परिस्थितीतही डॉ. रेड्डीज, नस्ले, एशियन पेंट्‌स, टीसीएस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.

अगोदरच महागाई वाढण्याच्या शक्‍यतेमुळे विविध देशातील रिझर्व्ह बॅंका व्याजदरात वाढ करणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये दक्षिण आफ्रिकेत करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. बऱ्याच देशानी आंतरराष्ट्रीय विमान सेवावर मर्यादा आण्ल्या आहेत. युरोपातील अनेक देशात लॉक डाऊन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे औषधी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रावर विक्रीचा परिणाम झाला.

सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्‍स 2,528 अंकांनी व निफ्टी 738 अंकांनी कोसळला आहे. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आगोदरच उच्च पातळीवर असल्याचे बोलले जात असताना जागतिक आघाडीवर परिस्थिती खराब झाल्यामुळे विक्रीचा जोर वाढला असे कोटक सेक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक श्रीकांत चव्हाण यांनी सांगितले.
रिऍल्टी, धातू, वाहन क्षेत्राच्या निर्देशांकामध्ये 6.42 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली. छोटया कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिड कॅप आणि स्मॉल कॅप सव्वातीन टक्‍क्‍यांनी कोसळले.

चीन, हॉंगकॉंग, जपान, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी आणि अमेरिकेच्या शेअर बाजाराचे निर्देशांकही कोसळल्याचे दिसून आले. महागाई वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे या आठवड्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बरीच विक्री केली आहे. काल या गुंतवणूकदारानी 2,300 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली असल्याची आकडेवारी शेअर बाजारांनी जारी केली.

No comments:

Post a Comment