Breaking

Friday, 27 August 2021

मुंबई/ कुंभारांची घागर यंदाही उताणीच, दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारल्याने तयार मडकी पडून.


कुंभारांची घागर यंदाही उताणी,
 दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारल्याने तयार मडकी पडून.........

 मुंबई : राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारल्याने कुंभार व्यावसायिकांचा हक्काचा हंगाम बुडाला आहे.
 यंदा उत्सव होण्याच्या आशेने तयार केलेली मडकी आता मागणीअभावी पडून आहेत. 
जवळपास ७५ टक्के मागणी घसरल्याचे मडके उत्पादकांनी सांगितले. 
दहीहंडी, नवरात्री, दिवाळी, मकरसंक्रांत अशा काही उत्सवांच्या निमित्ताने कुंभार व्यवसायाला चालना मिळत असते. 
त्यामुळे मागणी लक्षात घेऊन मातीकामातून दिवे, माठ, मडकी बनवण्याचे काम वर्षभर व्यावसायिक करत असतात. 
कोरोनामुळे सण-उत्सवांवर मर्यादा आल्याने त्यांचे उत्पन्नाचे साधन गेले आहे.
 श्रावणानंतर उत्सवांना सुरुवात होत असल्याने दहीहंडी हा कुंभार व्यावसायिकांच्या दृष्टीने कमावण्याचा पहिला सण.
 सध्या कोरोनास्थिती आटोक्यात आल्याने दहीहंडी उत्सव साजरा होईल, 
अशी आशा व्यावसायिकांना होती, 
परंतु शासन निर्णयानंतर त्यांचा अपेक्षाभंग झाला. 
मोठय़ा दहीहंडी मोजक्याच असल्या तरी स्थानिक विभागांमध्ये हा उत्सव मोठय़ा प्रमाणावर केला जातो. 
धारावीतील कुंभारवाडय़ातून मुंबईभर ही मडकी पुरविली जातात. 
‘कुंभारवाडय़ात यंदाही हजारो मडकी घडवण्यात आली.
 परंतु मागणीच नसल्याने ती वर्षभर पडून राहणार आहेत. 
दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारल्याने विशेष फटका बसणार आहे.
 उत्सव साजऱ्या करणाऱ्या मंडळांकडून मडक्यांना मोठी मागणी असते, 
परंतु यंदा मागणीत घट झाली आहे. 
शिवाय उत्सव बंद असल्याने पूर्वी ५० मडकी घेऊन जाणारे आता जेमतेम पाच मडकी घेत आहेत,’ अशी माहिती धारावीतील कुंभार व्यावसायिकांनी दिली.
 मातीची वस्तू वर्षभर सांभाळणे जोखमीचे असल्याने काही व्यवसायिकांनी मात्र अंदाज घेऊन कमी उत्पादन घेतले.

No comments:

Post a Comment