खंडणीप्रकरणी पोलीस उपायुक्तासह दोन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा........
मुंबई : मालमत्ता खरेदी-विक्री दलाल आणि गुंतवणूकदार असलेल्या व्यावसायिकाकडून १७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्यासह दोन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पठाण यांच्यासह भायखळा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्याविरोधात अंबोली पोलिसांनी सायंकाळी गुन्हा दाखल केला.
अंधेरीतील मालमत्ता खरेदी-विक्री दलाल आणि गुंतवणूकदार असलेल्या गुरूशरणसिंग चौहान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला आहे.
फसवणुकीच्या खोटय़ा गुन्ह्य़ात अडकवून आरोपींनी १७ लाख रुपये उकळल्याचा आरोप चौहान यांनी केला आहे.
फसवणूकीच्या एका गुन्ह्य़ात कारवाई न करण्यासाठी आरोपी अधिकाऱ्यांनी खबऱ्यांमार्फत चौहान यांच्याकडून १७ लाख रुपये घेतले.
तसेच त्यांच्याकडे आणखी पैशांसाठी तगादा लावला.
मात्र गुरूशरणसिंग यांनी आणखी पैसे द्यायला नकार दिल्यावर आरोपी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा नोंदविला,
असा आरोप चौहान यांनी केला आहे.
हा गुन्हा पुढील तपासासाठी गुन्हे शाखेच्या कक्ष १० कडे वर्ग करण्यात आला.
त्यावेळी कक्षाच्या प्रभारी पोलीस निरीक्षक पदाचा पदभार सुनील माने यांच्याकडे होता.
त्यांनी या खोटय़ा गुन्ह्य़ात अटक करून कोठडीत असताना १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
पत्नीलाही मानसिक त्रास दिला. अधिकाऱ्यांनी मारहाण करून कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतली, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.


No comments:
Post a Comment