लोकल प्रवासात वस्तू हरवल्याच्या ५,६१३ तक्रारी,
लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क;
वस्तू सापडण्याचे प्रमाण मात्र कमी.......
मुंबई : मोबाइलमधील करमणूक पाहण्यात गुंतलेले प्रवासी किंवा रंगलेला गप्पांचा फड यांमुळे लोकल प्रवासात अनेकदा प्रवासी आपल्या मौल्यवान वस्तू लोकलमध्येच विसरतात.
अशा विसरभोळ्या प्रवाशांनी वस्तू गहाळ झाल्याच्या किंवा त्या विसरल्याच्या पाच हजार ६१३ तक्रोरी लोहमार्ग पोलिसांच्या १५१२ हेल्पलाइनवर दोन वर्षांत करण्यात आल्या आहेत.
यापैकी सर्वाधिक तक्रारी मध्य रेल्वेकडे करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या वस्तू सापडण्याचे प्रमाण मात्र अत्यंत कमी आहे.
रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी १५१२ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
प्रवासात एखादी वस्तू हरवणे, विसरणे, याशिवाय लोकलमधील महिला आणि अपंगांच्या राखीव डब्यात घुसखोरी, विनयभंग, छेडछाड, फेरीवाला, भिकारी, मद्यप्राशन करून प्रवास करणारे इत्यादींविषयी तक्रारींचा भडिमार हेल्पलाइनवर होत असतो.
जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात पाच हजार ६४० आणि जानेवारी ते जुलै २०२१ दरम्यान दोन हजार ८९५ तक्रारी अशा विविध प्रकारच्या एकूण ८,५३५ तक्रोरी करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
लोकलमध्ये वस्तू विसरल्याने मदतीसाठी सर्वाधिक ५,६१३ तक्रारी करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेवर तीन हजार ६१७ आणि उर्वरित तक्रारी या पश्चिम रेल्वेवरील आहेत.
वस्तूंमध्ये कुणी खरेदी केलेले सामान, तर कुणाची कार्यालयीन बॅग, तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांची पिशवी इत्यादींचा समावेश आहे.
हेल्पलाइनच्या माध्यमातून तक्रार मिळताच लोहमार्ग पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातो,
अशी माहिती देण्यात आली.
परंतु ते सापडण्याचे प्रमाण बरेच कमी आहे.
आतापर्यंत २,२६० वस्तूच सापडल्या आहेत.


No comments:
Post a Comment