Breaking

Monday, 22 March 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- लसीकरणानंतर दोघांचा मृत्यू, लसीकरणाशी संबंध नसल्याचा प्रशासनाचा दावा.


लसीकरणानंतर दोघांचा मृत्यू !
लसीकरणाशी संबंध नसल्याचा प्रशासनाचा दावा

 नागपूर : कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण वाढवण्यावर केंद्र व राज्य शासनाकडून जोर दिला जात आहे; 
परंतु गेल्या काही दिवसांमध्ये नागपुरात लसीकरणाच्या २४ तासांनंतर एका वृद्धाचा, तर काही दिवसांनी दुसऱ्या एका शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 
रुग्णालय प्रशासनाकडून मात्र या मृत्यूंचा लसीकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला जात आहे. 
नीलकंठ अवचट (६१) रा. दिघोरी नाका आणि पांडुरंग ऊर्फ बंडू बारेकर (५९) असे दगावलेल्यांची नावे आहेत.
 बारेकर हे मेडिकलच्या स्वयंपाकगृहात मदतनीस पदावर असले तरी स्वयंपाकीचे काम करत होते. 
नीलकंठ अवचट यांनी मेडिकलच्या केंद्रात १७ मार्चला लस घेतली. 
या वेळी कुटुंबातील सदस्याला कोरोना असल्याचे लपवले. 
दुसऱ्या दिवशी १८ मार्चला त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची प्रकृती अचानक खालवल्याचे सांगत मेडिकलमध्ये आणले;
 परंतु डॉक्टरांनी तपासले असता त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे समोर आले. 
प्रतिबंधक लसीचा इतिहास बघता शवविच्छेदनासह अवयवांच्या अंशाचे नमुने हिस्टोपॅथेलॉजीसह इतर तपासणीसाठी पाठवले गेले. 
या अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
 तर पांडुरंग बारेकर यांना काही दिवसांपूर्वी मेडिकलमध्ये लस दिली होती. 
त्यानंतर तापासह हातात दुखण्याचा त्रास झाला. 
त्यांनी घराजवळील खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतले. 
शनिवारी त्यांची प्रकृती खालावल्यावर मेडिकलच्या डिझास्टर वॉर्डात उपचारासाठी आणले गेले. 
येथे रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या काही सहकाऱ्यांनी सांगितले. 
मेडिकलमध्ये कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे.

No comments:

Post a Comment