‘एन.आय.ए.’ने तपास पूर्ण झाल्यावर सर्वांसमोर बोलावं ;
विनाकारण बातम्या पसरवू नये .
जयंत पाटील....
.
अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणाचा तपास करणाऱ्या एन.आय.ए.कडून तपास सुरू आहे.
सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर यासंदर्भातील वेगवेगळ्या बातम्या समोर येताना दिसत आहे.
त्यावरून राज्याचे जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एन.आय.ए.ला सल्ला दिला आहे.
“सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे यांच्या चौकशीबाबत एन.आय.ए.ने निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतरच बोलावे.
दररोज विनाकारण बातम्या पसरवू नयेत,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील यांनी एन.आय.ए.च्या तपासावर भूमिका मांडली.
“या सगळ्यामुळे तपास प्रक्रियेविषयी काहीच माहिती नसलेल्या समाजातील लोकांपर्यंत चुकीचा संदेश जातो.
त्यामुळे एन.आय.ए.ने प्रथम संपूर्ण तपास पूर्ण करावा.
या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागला की अधिकृतपणे सर्वांसमोर येऊन बोलावे.
केंद्रीय यंत्रणांनी तपास जरुर करावा.
मात्र, वर्तमानपत्रांमध्ये अमक्याने हे केलं, ते केलं, अशा बातम्या सोडू नयेत.
या सगळ्या जेव्हा पुराव्याआधारे ‘एन.आय.ए.’ने निष्कर्ष जाहीर केल्यानंतर राज्य सरकार संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करायला तयार आहे,” असं पाटील म्हणाले.
नारायण राणे यांच्यावरही जयंत पाटील यांनी टीका केली.
“पाण्याच्या बाहेर असल्यावर माशाची जशी तडफड होते त्याप्रमाणे नारायण राणे यांची अवस्था झाली आहे.
नारायण राणे यांना पुन्हा कधी सत्तेत जाऊन बसतो, असं झालं आहे.
त्यामुळे काहीही झालं की ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करतात.
हाच न्याय लावायचा झाल्यास प्रथम उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल,” असं म्हणत पाटील यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिले.


No comments:
Post a Comment