हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ कायम.....
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांच्या साठय़ासह सापडलेल्या मोटारीचे मालक मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातील निष्कर्षांबाबत ठाणे पोलिसांनी मौन बाळगल्याने मृत्यूचे गूढ कायम आहे.
कलिना येथील प्रयोगशाळेत पाठविलेल्या विसेरा अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाल्यानंतरच ते जाहीर करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यासाठी आणखी १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत.
मुंबई पोलीस मनसुख यांची चौकशी करीत होते.
ती सुरू असतानाच ठाणे पोलिसांना त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळला होता.
त्यानंतर त्यांच्या पत्नी विमल यांनी, मनसुख आत्महत्या करूच शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया माध्यमांकडे व्यक्त केली होती.
तर, हा घातपाताचा प्रकार असल्याचा दावा त्यांच्या निकटवर्तीयांनी केला होता.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये मनसुख यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले.
मात्र, शनिवारी रात्री उशिरापर्यंत ठाणे पोलिसांनी शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालाबाबत मौन बाळगले होते.
संवेदनशील प्रकरण असल्यामुळे पोलिसांनी त्यांचा विसेरा कलिना येथील प्रयोगशाळेत पाठविला आहे.
दरम्यान, भा.ज.पा.चे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि मंगलप्रभात लोढा यांनी मनसुख यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मनसुख यांचे कुटुंबीय सकाळी मनसुख यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत होते.
हा घातपात असून मनसुख यांच्या मृत्यूचे कारण कळल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही.
अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
मात्र, पोलिसांच्या विनंतीनंतर मनसुख यांच्या कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेतले.


No comments:
Post a Comment