लवकरच अभिनव ‘अंडा पार्क’
‘अंडे शाकाहारी की मांसाहारी?’
या सनातन प्रश्नाचे उत्तर मिळो अथवा न मिळो मात्र, अंडय़ातील पोषक तत्त्वाची माहिती समाजाला व्हावी, अंडी, कोंबडय़ांविषयी असलेला चुकीचा समज दूर व्हावा आणि कुक्कुटपालन व्यवसायात युवकांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अभिनव संकल्पनेतून उपराजधानीत ‘अंडा पार्क’ उभा राहणार आहे.
अंडय़ामधील गुणतत्त्व, त्यापासून निर्माण होणाऱ्या विविध जमातींच्या कोंबडय़ा, अंडे आणि चिकनचे खाद्यपदार्थ मिळणारे उपाहारगृह, लहानांसाठी खेळाचे मैदान, अंडी व कोंबडी विक्री केंद्र, फॅन्सी कोंबडय़ा येथे बघायला मिळणार आहेत.
पशुतज्ज्ञ व पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुक्कुटपालन विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. मुकुंदा कदम यांच्या संकल्पनेतून हा ‘अंडा पार्क’ तयार होणार असून त्यासाठीचा ८ कोटींचा प्रस्ताव पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना सादर करण्यात आला आहे.
केदारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
‘माफसू’च्या फुटाळा तलावानजीकच्या पोल्ट्री संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या अडीच एकर जागेवर दोन वर्षांत हा ‘अंडा पार्क’ उभा करण्याचे प्रयत्न आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजावा व विज्ञान शिक्षणात आवड निर्माण व्हावी याचे धडे ‘रामन विज्ञान केंद्र’ अनेक वर्षांपासून देत आहे.
आता याच धर्तीवर हा ‘अंडा पार्क’ उभा राहणार आहे.
याबाबत या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. कदम यांनी सांगितले की, कोंबडय़ाशी संपर्कात न येताही कोंबडी अंडी देते.
अंडी देणे हा कोंबडीचा नैसर्गिक गुण असल्याने त्यात जीव राहत नाही.
कुक्कुटपालन केंद्रांमधून बाजारात येणारी सर्व अंडी शाकाहारीच असतात, असा दावा डॉ. कदम यांनी केला आहे.


No comments:
Post a Comment