Breaking

Saturday, 7 November 2020

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- " बा विठ्ठला,सरकारला सदबुद्धी दे," असे साकडे घालून मराठा ठोक मोर्चा पंढरपूरातून मंत्रालयाकडे रवाना.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- "बा विठ्ठला, सरकारला सदबुद्धी दे," असे साकडे घालून मराठा ठोक मोर्चा पंढरपूरातून मंत्रालयाकडे रवाना- याबाबत सविस्तर वृत्त असे की "बा विठ्ठला, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठाकरे सरकारला सदबुद्धी दे असे साकडे घालून मराठा क्रांती ठोक मोर्चा पंढरपूर मधील नामदेव पायरीचे दर्शन घेऊन मार्गस्थ झाला.






सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पंढरपूरातील विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चौफाळा या परिसरात संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. शनिवारी सकाळी पासून पंढरपूर शहरात येणार्या सर्व प्रमुख रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यात आले होते. मात्र, संचारबंदीचा आदेश झुगारून मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्ते शिवाजी चौकात एकत्र आले होते. नामदेव पायरीचे दर्शन घेऊन आम्ही मोर्चाला सुरूवात करू,या मागणीसाठी त्यांनी शिवाजी चौकात ठिय्या मांडला होता. त्यानंतर प्रशासनाने ठराविक कार्यकर्त्यांना परवानगी दिली, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव पायरीचे दर्शन घेऊन शहरातून प्रस्थान केले. 






या मोर्चा मध्ये राज्य समन्वयक सुनिल नागणे, महेश लांडगा, धनंजय साखळकर, किरण घाडगे, अर्जुन चह्वाण, संदीप मांडवे, रामभाऊ गायकवाड, नितिन शेळके, दिपक वाडदेकर, आदींसह मराठा समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते, मात्र नवीन बस स्थानकासमोर आल्यानंतर पोलिस प्रशासनाने मोर्चा रोखला, व मोर्चा तील प्रमुख दहा कार्यकर्त्यांना खाजगी वाहनाने पुण्याकडे रवाना केले, पुण्यामध्ये राज्य सचिवांबरोबर मराठा क्रांती मोर्चातील पदाधिकार्यांशी चर्चा होणार आहे असे समजते. 






मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम, प्रांताधिकारी सचिन ढोले, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment