सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - ग्रामीण भागात आॅनलाईन शिक्षण हे कुचकामी ठरत आहे- याबाबत सविस्तर वृत्त असे की कोरोना विषाणूच्या भीतीने राज्यात आजपर्यंत सर्व शाळा बंद आहेत.शाळा बंदचा जास्तीत जास्त परिणाम ग्रामीण व दुर्गम भागात झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.इयत्ता पहिली ते चवथी पर्यंत शिक्षण घेणारे जि.प.शाळेतील विद्यार्थी चक्क अभ्यासच विसरले आहेत अशी सध्याची परिस्थिती आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात इंटरनेट अभावी आॅनलाईन शिक्षण कुचकामी ठरत असून ग्रामीण विद्यार्थी गुणवत्तेत मागे पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन करण्यात आले होते. परंतु कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर लाॅकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली. दरम्यान हळूहळू परिस्थितीत बदल घडून येत असले तरी जिल्ह्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नाहीत. आॅनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे.मात्र ग्रामीण व दुर्गम भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामीण विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
विशेष म्हणजे ग्रामीण भागातील 80% पालकांकडे स्मार्ट फोन नाही. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थी शाळा बंद असल्याने शालेय अभ्यासक्रम विसरले आहेत. 1 ते 100 पर्यंतचे पाढे त्यांना म्हणता येत नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे. मराठी भाषेतील वाचन व लेखन विद्यार्थ्यांना अचूक रित्या येत नाही. आदीवासी भागात शिक्षणाचा प्रसार अतिशय कमी आहे.काही वर्षांपूर्वी आदीवासी समाजाची मुले शाळेत जायला घाबरत होती.परंतु शासनाने विद्यार्थ्यांना अनेक उपाययोजना करून शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिक्षणाची गोडी निर्माण केली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पटसंख्या वाढली आहे. परंतु आता शाळा प्रत्यक्ष भरत नसल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे.
पालकांसोबत मुले शेतात जाऊ लागली आहेत. दुर्गम भागातील बर्याच कुटूंबाची व ग्रामीण भागातील अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून त्यांच्याकडे स्मार्ट फोन चा अभाव आहे. विद्यार्थ्यांना मिळणार्या सोयीसुविधा, तज्ञ शिक्षक व तंत्रज्ञानाचा वापर याबाबत बरेच पालक अनभिज्ञ आहेत. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी यंदा गुणवत्तेत मागे पडणार आहेत. अभ्यासाऐवजी ते विविध खेळात मग्न असल्याचे दिसून येते. त्यामुळे आॅनलाईन शिक्षण हे कुचकामी ठरत आहे.


No comments:
Post a Comment