पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार-मुंबई येथे विमानतळावरून सहा कोटींचे कोकेन जप्त व एका परदेशी महिलेस अटक- याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई विमानतळावर महसूल गुप्त वार्ता संचलनालयाने कारवाई करत एक किलो कोकेनसोबत एका परदेशी महिलेस अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या कोकेन ची किंमत जवळपास सहा कोटी रुपये इतकी आहे.
डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहिती आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. एलेना कसाकातिरा वय 43 असं या अटक करण्यात आलेल्या परदेशी महिलेचे नाव आहे. ही महिला आरोपी पूर्व आफ्रिकेतील मालवीची नागरिक आहे, अदिस अबाबा विमानतळावरून दुबई मार्गे मुंबईत दाखल झाली होती. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर ती सोमवारी आली असताना तिला अटक करण्यात आली आहे.
तिच्यासोबत असणार्या ट्राॅलीत ड्रग्ज असल्याची गुप्त माहिती केंद्रीय यंत्रणेला मिळाली होती, तपासणीत ट्राॅलीत गुप्त जागेत दोन पाकिटे सापडली. कार्बनपेपरमध्ये ही पाकिटे लपवण्यात आली होती. त्यामधील प्रत्येक पाकिटात अर्धा किलो कोकेन सापडले. महिलेकडून एकूण एक किलो कोकेन जप्त करण्यात आले असून त्या कोकेन ची किंमत जवळपास सहा कोटी रुपये इतकी आहे. सदर महिलेकडून एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत कोकेन जप्त करण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले. त्यानंतर या महिलेस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिला सात डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पूर्वी अंगावर बांधून ड्रग्जची तस्करी व्हायची आता साहित्यात लपवून ड्रग्ज आणण्याचे प्रमाण वाढले आहे. आठवड्यात दुसर्या कारवाईत विमानतळावरून कोकेन जप्त करण्यात आले आहे. यापूर्वी अर्धा किलो कोकेन तस्करी प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.


No comments:
Post a Comment