Breaking

Sunday, 8 May 2022

टेंभूर्णी शहर प्रतिनिधी /अक्षय खंदारे - अंजली सुरवसे खून प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन...जनशक्ती संघटनेने दिला इशारा.


अंजली सुरवसे खून प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन
 जनशक्ती संघटनेने दिला इशारा
 मिटकलवाडी (ता. माढा) येथील अंजली सुरवसे खून प्रकरणातील सर्व आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. राजकीय दबावापोटी पोलिसांनी या क्रूर आरोपींना अजूनही अटक केली नाही. त्यामुळे यांना अटक न झाल्यास सोमवार दि.९ मे रोजी टेंभुर्णी पोलिसांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा जनशक्ती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख बाबासाहेब कोळेकर यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

 मृत अंजली सुरवसे हिला सासरच्या मंडळींनी छळ करून अत्यंत क्रूरपणे मारून टाकले होते. पोलिसांनी केवळ अपघाताचा गुन्हा नोंद करून एक प्रकारे अन्यायच केला होता. मात्र जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी या प्रकरणाची सत्यता व परिस्थिती पाहिल्यानंतर अंजलीचा अपघात नसून घातपात असल्याचे ठोसपणे सांगून या प्रकरणातील आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते.

 दरम्यान शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी पती हनुमंत गोवर्धन सुरवसे याला अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असणारे सासु अन्नपूर्णा गोवर्धन सुरवसे, दीर वैभव गोवर्धन सुरवसे, नणंद राणू विठ्ठल मुळे, अंजली बाळासाहेब थिटे, विठ्ठल नामदेव मुळे यांना अद्याप अटक केली नाही. विशेष म्हणजे या आरोपींना या प्रकरणातून मुक्त करण्यासाठी राजकीय दबावापोटी पोलिस सहकार्य करत असल्याचा धक्कादायक खुलासा यावेळी बाबासाहेब कोळेकर यांनी केला आहे. तर फरार असलेले आरोपी मयत अंजलीच्या वडिलांना आणि भावांना फिर्याद माघारी घेण्यासाठी अथवा नावे कमी करण्यासाठी धमकावत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या क्रूर आरोपींना अटक करून पोलिसांनी न्याय द्यावा अशी मागणी करून अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

 यावेळी पंढरपूर तालुका युवक प्रमुख गणेश ढोबळे, बापूसाहेब मोहिते, राजाभाऊ कणसे, जयदेव संभाजी कदम, राजेश कदम, संजय कदम, बालाजी कदम, दत्ता पवार, अनिल मुळे, नामदेव मुळे, नागनाथ कदम, आंबादास कदम यांच्यासह जनशक्ती चे पदाधिकारी उपस्थित होते. 

 महिला आयोग लक्ष घालेल का...?
- अंजली सुरवसे या भगिनीचा अपघात झाला नसून घातपात झाला आहे हे कुणीही ठामपणे सांगेल. मात्र मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे पोलीस प्रशासन एका राष्ट्रवादीच्या आमदाराच्या दबावापोटी मयत अंजली वर जाणून बुजून अन्याय करत आहे. अवैध धंद्यातून लाखो रुपये गोळा करणारे हे प्रशासन अशाच दुःखद घटनेत सुद्धा आरोपींच्या बाजूने उभे राहात असेल तर दुर्दैवाची बाब आहे. राष्ट्रवादीकडेच असलेले महीला आयोग आणि त्याच्या प्रमुख रूपाली चाकणकर या प्रकरणाकडे लक्ष देऊन मयत अंजली ला न्याय मिळवून देतील का हे पाहणे महत्त्वाचे आहे. अंजली ला न्याय मिळेपर्यंत जनशक्ती संघटना स्वस्थ बसणार नाही.

 अतुल खूपसे-पाटील
- संस्थापक जनशक्ती संघटना

No comments:

Post a Comment