अश्विनी व अशोक वळसंगकर दांपत्याकडून
'संगीत' व 'विधी'तून प्रथम येणाऱ्यास मिळणार सुवर्णपदक!
सोलापूर :- येथील जेष्ठ विधिज्ञ अशोक वळसंगकर आणि ज्येष्ठ संगीताचार्य डॉ. अश्विनी वळसंगकर या दांपत्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सहा लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे.
या देणगीच्या रकमेतून आता दरवर्षी संगीत आणि विधी अभ्यासक्रमातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
ॲड. अशोक वळसंगकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातून 'एल.एल.एम.'च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीस सुवर्णपदक देण्यासाठी तीन लाख रुपयांची देणगी दिली आहे.
कै. ॲड. गुंडोपंत सखाराम वळसंगकर व कै. ॲड. विष्णुपंत गुंडोपंत वळसंगकर यांच्या स्मृत्यर्थ हे सुवर्णपदक आता दरवर्षी देण्यात येणार आहे.
याचबरोबर डॉ. अश्विनी वळसंगकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातून एम.ए. संगीतच्या अभ्यासक्रमातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीस सुवर्णपदक देण्यासाठी तीन लाख रुपयांची देणगी दिली आहे.
श्री चिंतामण भास्कर फडणीस व कै. लता चिंतामण फडणीस यांच्या नावे हे सुवर्णपदक देण्यात येणार आहे.
दरवर्षी दीक्षांत सोहळ्यात विविध विषयात गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाते.
सुवर्णपदकांची संख्या ५५ इतकी होती.
आता यामध्ये दोन सुवर्णपदकांची वाढ होऊन त्याची संख्या ५७ इतकी झाली आहे.
वळसंगकर दांपत्याकडून देण्यात आलेल्या देणगीमुळे विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले आहे.
कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी
संगीत विभाग सुरू केल्याचा आनंद......
कुलगुरु डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी गेल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यापीठाचा चौफेर विकास केल्याचे दिसून येते.
अनेक अभ्यासक्रम सुरू करून त्यांनी विद्यार्थ्यांची सोय केली.
त्यात भाषा संकुल, ललित व वांग्मय संकुल सुरू केल्याचा अतिशय आनंद आहे.
विद्यापीठात संगीत विभाग सुरू करण्यासाठी संगीत क्षेत्रातील तज्ञांची फार इच्छा होती.
यासाठी कुलगुरु डॉ. फडणवीस यांच्याकडे आम्ही प्रस्ताव दिला.
त्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन संगीत व नाट्य विभाग सुरू करून दर्जेदार शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला,
याचा आनंद आहे.
त्यामुळेच आज आम्ही विद्यापीठास मदतीचा हात दिला. यापुढेही मदत करणार असल्याचे ज्येष्ठ संगीताचार्य डॉ. अश्विनी वळसंगकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment