*'राफेल' नाय 'फायर है मैं', बैलाला मिळाली एस.यु.व्ही.(SUV) कारपेक्षा जास्त किंमत!*
पुणे जिल्ह्यातील वाडा येथील एका बैलगाडा मालकाला आपल्याकडे असलेल्या बैलाला आलिशान कारची किंमत मिळाली असल्याने जिल्ह्यात अनेक भुवया उंचावल्या आहेत. मैसूर जातीच्या "राफेल" बैलाला तब्बल १९ लाख ४१ हजार इतकी किंमत मिळाली आहे.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर शर्यत प्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे. ग्रामीण अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या या बैलगाडा शर्यतीमुळे सर्वत्र पुन्हा एकदा या उत्साहाचे वातावरण आहे.
या बैलगाडा शर्यत सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील बैल बाजारही गजबजू लागले आहेत.
वेगवेगळ्या ठिकाणी भरल्या जाणाऱ्या बैल खरेदी विक्री बाजारात पुन्हा एकदा लाखोरुपयांची उलाढाल होऊ लागली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलांची विक्री करण्यासाठी शेतकरी येत आहेत.
अश्याच प्रकारे खेड तालुक्यातील पश्चिम भागातील वाडा येथील शेतकऱ्याच्या शर्यतीच्या बैलाची तब्बल १९.४१ लाखांना विक्री झाली आहे.
वाडा (ता. खेड) येथील शेतकरी अक्षय मुळूक, सिद्धार्थ हुंडारे याच्या राफेल बैलाने लांडेवाडी घाटात प्रथम बारी झाली.
इंदोरी नामांकित शर्यतीमध्ये पहिला नंबर तसेच थापलिंग घाटाचा राजा किताब मिळविला बैलाने शर्यतीत केलेल्या कामगिरीचे बैलगाडा प्रेमींमध्ये आकर्षण होते.
राफेल हा मैसूर बेरड जातीचा बैल असून ४ महिन्याचा असताना निलेश घनवट यांच्या दावणीतून ऑक्टोबर २०२० मध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी असताना दीड वर्षापूर्वी घेतला होता.
त्यावेळी बैलाची किंमत ४४ हजार होती.
अनेकांच्या मनात या राफेलने घर केले होते.
राफेल बैलाचे देखणे रूप व दौड बैलगाडा शौकीन त्याच्यावर खुश होते.
राफेलची यापूर्वी प्रथम १० लाखाला मुळूक यांचेकडे मागणी केली होती.
परंतु, मुळूक यांनी या व्यवहाराला नकार दिला.
त्यानंतर पै. संकेतशेठ आहेर बैलगाडा संघटना (चिखली) व कै. सहादू मामा काळोखे बैलगाडा संघटना (देहूगाव) यांनी तब्बल १९.४१ लाखाला रूपये देऊन बैलाची खरेदी केली आहे.
पुणे जिल्ह्याच्या विविध भागात भरणाऱ्या बैल बाजारात शर्यतीच्या बैलांची मागणी वाढली आहे.
या बैलाच्या खरेदीसाठी लाखो रुपये बैलगाडा प्रेमींकडून मोजले जात आहेत.
यामुळे बैलाची विक्री लाखो रुपयांना होत आहे.
याबरोबरच शर्यतीसाठी बैलांची खरेदी करताना विशिष्ट जातीच्या बैलांची मागणी शर्यतप्रेमींकडून केली जात आहे.
बैलाला घाटात जुपण्यासाठी छाती किंग विक्रम शेठ तनपुरे, प्रतिक कदम आणि सागर तनपुरे यांचे मोलाचे सहकार्य होते. बैलगाडा विश्वात राफेलने मात्र पंचक्रोशीचे नाव गगनाला भिडवले असल्याने राफेलला घेऊन जाताना मात्र पंचक्रोशीतील अनेकांचे डोळे पाणावले होते.
No comments:
Post a Comment