*वाळवा तालुक्यातील तांदूळवाडीचे सरपंच रमेश वसंतराव पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पदावरून काढून टाकण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.*
सदस्य अर्जुनराव पाटील, राहुल कांबळे, बजरंग गुरव यांच्यावरही ठपका ठेवत उर्वरित सर्व दहा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. ग्रामसेवक सतीश गोंदकर यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी हा निकाल दिला.ग्रामपंचायत सदस्य भानुदास मोटे यांनी पदाधिकारी व ग्रामसेवक नियमबाह्य काम करत असल्याची तक्रार केली होती. उच्च न्यायालयातही याचिका दाखल करीत नियमबाह्य काम केल्याचे पुरावे सादर केले होते. संबंधितांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत आयुक्तांनी हा आदेश दिला.
हेही वाचा: ‘पॅनेक्स-२१’साठी बिपिन रावत येणार होते पुण्यात
१८ नोव्हेंबर २०१७ ते १७ नोव्हेंबर २०२२ असा पदाधिकाऱ्यांचा कालावधी आहे. दरम्यान, एक वर्ष आधीच ग्रामपंचायत बरखास्तीची वेळ आली. विभागीय आयुक्तांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी ३० एप्रिल २०२१ ला संबंधितांवर चौकशी करून कारवाईचा अहवाल सादर केला होता. २९ सप्टेंबर व २६ ऑक्टोंबर या दोन दिवशी ऑनलाइन सुनावणी होऊन बाजू ऐकून घेण्यात आली होती. श्री. मोटे यांनी उच्च न्यायालयातही याचिका दाखल करून कारवाईची मागणी केली होती. न्यायाधीशांनी आठ आठवड्यात तपास करून कार्यवाहीचे आदेश दिले. आयुक्तांनी ऑनलाईन सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून झालेल्या तपासणीनंतर सरपंचांना पदावरून काढून पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी करावी, वसुलीचे आदेश व्हावेत, ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करावा, ग्रामसेवक सतीश गोंदकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जमीनदोस्त करावीत, अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. सरपंच व सदस्यांचे ग्रामपंचायतीमधील आर्थिक कारभारावर कसलेही नियंत्रण नाही, त्याला सरपंच जबाबदार आहेत. कर्तव्याकडे दुर्लक्ष केले आहे, असेही निकालात म्हटले आहे. त्यानुसार आयुक्तांकडून कारवाई झाली आहे.


No comments:
Post a Comment