"उजनी"च्या पाण्यासंदर्भात जिल्ह्यातील "राजकीय नेते" शांत का..?
"आधी बारामतीकर अन् आता इंदापूरांनी पळविले उजनीचे पाणी" अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली अन् जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. सोशल मिडीयावर पालकमंत्री दत्ता भरणे यांच्याविरोधात उठाव सुरु झाला. बघता बघता जिल्ह्यामध्ये एक चळवळ उदयास आली आणि या चळवळीची ठिणगी पडली उजनी जलाशयात. शेतकरी नेते अतुल खुपसे पाटील यांनी उजनी धरणात भरणेंच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढुन, पुतळा बुडवुन निषेध व्यक्त केला. मुळातच 'कुणी बी यावे अन् टिकली मारुन जावे' अशी अवस्था उजनीची किंबहुना सोलापूर जिल्ह्याची झाली आहे. उजनी चं पाणी असेच चोरीला गेले तर भविष्यात सोलापूर जिल्हा दुष्काळयुक्त जिल्हा झालेला दिसेल हे माहित असताना देखील जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेते, पुढारी, लोकप्रतिनिधी शांत का..? त्यांना फक्त राजकारणातुपुरता शेतकरी दिसतो का..? की मतापुरते कार्यकर्ते..? असा आर्त सवाल शेतकऱ्यांमधुन तळमळीने विचारला जात आहे.
बारामती करांच्या आशिर्वादाने मुख्यमंत्र्यांच्या सहिने पालकमंत्री भरणे यांनी उजनीचे पाणी पळविले आहे हे जिल्हा आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कळाले आणि त्यामुळे जिल्ह्यातील चळवळीतील कायकर्ता जागा व भरणेंच्या विरोधात आक्रमक झाला. त्यामुळे आता पळवाट शोधल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात येताच भरणे यांनी पत्रकार परिषद घेवुन "उजनीतील पाण्याचा एक थेंबही नेला तर राजकारणातुन संन्यास घेईन" असे पोकळ आणि मोजक्या गुलाम कार्यकर्त्यांना भरीव वाटेल असे वक्तव्य केले. मुळातच राजकारण ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे आणि जनता येडी आहे हे समजलेल्या तुमच्यासारख्या कोणत्याच बाजारबुणग्याने राजकारणातुन संन्यास घेतला नाही तिथं तुम्ही काय घेणार..?
असो, तुमची सोलापूर जिल्ह्यात "पालकमंत्री" म्हणून केलेली आणि इंदापूरला जावुन "आमदार" म्हणून केलेली वक्तव्य नक्कीच विरोधाभास दर्शविणारी आहेत. कारण तुमचा मुळ उद्देश "5 TMC तो ट्रेलर... सभी उजनी का पिक्चर करना बाकी" हा आहे. म्हणजे सरळसरळ उजनी धरण तुम्हाला बारामती-इंदापूरकडे वळवायचे आहे हे आमच्या लक्षात न येण्याइतके आम्ही धोतरावर इनशर्ट करत नाही.
विशेष म्हणजे इतकं सगळं रामायण-महाभारत घडत असताना जिल्ह्यातील कोणताच पुढारी, लोकप्रतिनिधी आक्रमक होताना दिसला नाही. फक्त आमच्यासारख्या माध्यमांच्या प्रतिनिधींचा किडा शांत बसवत नाही म्हणून बळेच फोन करुन विचारल्यानंतर "तुम्हाला तर संगळं माहितीच की - बारामतीकरांचा वाईटपणा कशाला घ्यायचा" पण लिहा "उजनीतुन एक थेंबही पाणी जावु देणार नाही, आम्ही जनतेसोबत आहे" अशा मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिल्या जातात.
मात्र उजनी पाण्यासंदर्भात काहीतरी वेगळं शिजतंय हे आपल्या पथ्यावर पडेल, किंबहुना यामध्ये भरणेंचा बळी पडेल आणि त्यानिमित्ताने जिल्ह्याची सुत्रे आपल्या हाती येतील अशा उकळ्या शिंदे बंधुंना फुटु लागल्या त्यामुळे "आम्ही पवार कुटुंबियांना सर्वस्व मानतो पण पाण्यासंदर्भात जनतेसोबत आहे" अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या शिंदे बंधुंनी दिली.
कधीकाळी जिल्ह्याचे 'सिंह' असणारे मोहिते पाटील यांनी पाण्यासंदर्भात अद्यापही 'डरकाळी' फोडली नाही. कदाचित आपण यामध्ये उतरलो तर जनतेचा रोष भरणेंवर वाढेल आणि त्यांची आयतीच 'शिकार' होईल. परिणामी 'शिंदे' यांना आयतंच 'सावज' मिळेल आणि भविष्यात मंत्री म्हणून ते 'बोकांडी' बसतील. त्यामुळे मोहिते पाटील शांत आहेत. खासदार नाईक निंबाळकर व आमदार सातपुते "मालक बोलले नाहीत आणि आपलं काय घोडं अडलंय आपण कुठे इथं नांदायला आलोय" म्हणून शांतीच्या मार्गाने आहेत.
पंढरपूर-मंगळवेढ्याचे परिचारक - आवताडे सध्या निवडणुकींच्या आकडेमोडीत व्यस्त आहेत. त्यांची आर्थिक गणितं व मदतानाची आकडेवारी अद्याप जुळली नसल्याने ते दोघेही शांततेत आहे त्यामुळे यातुन सवड मिळाली तर कदाचित उजनीच्या पाणिचोरीबद्दल नक्की बोलतील. राहिला प्रश्न भगिरथांचा. ते अजूनही भावनिकतेच्या जगात वावरत आहेत. त्यांना शेतकऱ्यांबद्दल कळवळा येण्यासाठी अजुन ४-२ पावसाळे खावं लागणार.
मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने यांची जन्मभूमी इंदापूर आणि कर्मभूमी मोहोळ. म्हणजे उजनीच्या पाणीचोरीबद्दल "इकडं आड अन् तिकडं विहिर" अशी अवस्था झालीय मानेंची. कुणासारखं बोलायचं..? भरणेंना विरोध करावा तर जिल्ह्याला येताना गाडीत जागा मिळाची नाही आणि सपोर्ट करावा तर मोहोळवाली भविष्यात जागा देणार नाहीत अशा द्विधा मनस्थितीत आहेत शिवाय आज ना उद्या आपल्याला पक्षनिष्ठेचे फळ मिळेल म्हणून श्रेष्टींच्या विरोधात बोलायचं कसं म्हणून अनगरकर पाटील देखील शांत आहेत. इकडे शेटफळ डोंगरेंना दोन्ही मामा जवळचे त्यामुळे सध्या हाताची घडी तोंडावर बोट असा पवित्रा त्यांनी घेतला आहे तर कोल्हापूर महाडिकांना याच्याशी काही देणंघेणं नाही.
बार्शीचे राजाभाऊ राऊत आक्रमक व्हायला हवे होते पण बार्शीच्या सर्व योजना बंद पडायला हवाय असं वाटतं बिटतं का कुणास ठाऊक त्यांना. दिलीप सोपल तर मोठ्या साहेबांची धाकल्या पवारांची मर्जी राखणारे उद्धव साहेबांचे कडवट शिवसैनिक झाले आहेत त्यामुळे त्यांना याच्याशी काही देणंघेणं नाहीच मुळात.
अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टींना बापूंनी काही बोलु नको म्हणून सक्त सुचना केल्या आहेत. कारण दक्षिण चे सुभाषबापु देखील उजनीच्या पाण्याबाबत अद्याप काहीच बोलले नाहीत. आपण बोललो तर पुन्हा आपले कारखाने, पंतसंस्था वगैरे अडचणीत येण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज आलाय त्यांना एकदा. पण इकडे दक्षिण चे देशमुख बोलले नाहीत म्हणून हिंमतीने शहरचे देशमुख बोलले पण बोलण्यात म्हणावा तसा दम दिसला नाही.
सांगोल्याला तर असाच दुष्काळ राहिलेला बरा असा कयास आमदार पाटलांना वाटतं की काय कुणास ठाऊक. गणपत आबानंतर आपलीच लॉटरी लागेल हा विचार साळुंखे पाटलांचा आहे. कारण त्याशिवाय "फार्म हाऊस" वर "हौस" पुरविण्याचे भाग्य मिळणार नाही.
एकंदरीत जिल्ह्यातील सगळ्याच पक्षाचे पुढारी खिशात हात घालुन निवांतपणे मजा पाहु लागलेत. हा विरोध इंदापूरकरांना नव्हे तर बारामतीकरांना आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. आणि बारामतीकरांनी ५ TMC काय..? अहो समदं धरण जरी नेलं तर कोणताच पुढारी रस्त्यावर उतरणार नाही हे धगधगतं वास्तव आणि त्रिकालाबाधित सत्य आहे.
त्यामुळे गावातील छोट्या मोठ्या पुढाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी शांत बसणं म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारुन घेण्यासारखं आहे.
कोणत्याच पक्षाच्या नादी लागु नका. आपण आपल्या हक्कासाठी लढायचं आहे इतकं लक्षात ठेवा.
No comments:
Post a Comment