गुंड गजा मारणेची समाजमाध्यमावर दहशत,
पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आणखी एक गुन्हा......
पुणे : तळोजा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर मोटारीच्या ताफ्यातून कोथरूडपर्यंत मिरवणूक काढणाऱ्या गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे आणि साथीदारांनी समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
मारणे टोळीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
शहरात झालेल्या दोन खुनांच्या गुन्ह्यातून मारणे आणि साथीदारांची मुक्तता झाली.
त्यानंतर तळोजा कारागृहातून बाहेर पडलेल्या मारणे आणि साथीदार दोनशे मोटारींच्या ताफ्यातून कोथरूडमध्ये आले.
द्रुतगती मार्गावर मारणे टोळीतील गुंडांनी धुडगूस घातला.
मोटारीतून निघालेल्या मिरवणुकीचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले.
या प्रक रणी मारणे आणि साथीदारांविरोधात खालापूर, शिरगाव, वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
मारणेच्या साथीदारांकडून महागड्या मोटारी आणि ड्रोन कॅमेरा जप्त करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर मारणे आणि साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
मारणे टोळीवर केलेल्या कारवाईचा अहवाल पाठविण्याची सूचना पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी दिले आहेत.
मारणे आणि त्याच्या साथीदारांनी समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात मंगळवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड तपास करत आहेत.
मारणे आणि साथीदारांविरोधात आणखी सात गुन्हे दाखल असून ते मे.न्यायालयात प्रलंबित आहेत.


No comments:
Post a Comment