ग्रामपंचायतीमध्ये दप्तर गहाळ करून लाखोंचा भ्रष्टाचार,
कारवाईमध्ये चालढकल केली जात असल्याचा सदस्यांचा आरोप......
वाडा: चार हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या वाडा तालुक्यातील खानिवली ग्रामपंचायतीमध्ये विविध विकास कामांमध्ये अनियमितपणा करुन व दप्तर गहाळ करुन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकांनी लाखोचा भ्रष्टाचार केला असल्याचे उघडकीस आले आहे.
परंतु कारवाईमध्ये चालढकल केली जात असल्याचा आरोप या ग्रामपंचायतीच्या चार विद्यमान सदस्यांनीच केला आहे.
वाडा तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेल्या खानिवली ग्रामपंचायतीमध्ये सन २०१७-१८ या अर्थिक वर्षात विविध विकास कामांच्या नावांवर तत्कालीन ग्रामसेवक एकनाथ इंगळे व सरपंच तुळसा पवार यांनी लाखो रुपयांचा निधी हडप केल्याचा आरोप या ग्रामपंचायतीचे सदस्य भरत हजारे, रघुनाथ पाडेकर, कामिनी हजारे, गिता धानवा या विद्यमान सदस्यांनी केला आहे.
हा भ्रष्टाचार प्रशासनाने केलेल्या तपासणी अहवालात उघड होऊनही संबंधितांवर आजवर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य भरत हजारे यांनी सांगितले.
या ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक एकनाथ इंगळे हे सद्या मयत असल्याने (२३ मे २०१८ रोजी मयत) या ठिकाणी नव्याने नियुक्ती झालेल्या ग्रामसेवकाला चौकशीला सामोरे जावे लागत आहे.
ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे दप्तर गहाळ झाल्याबाबतची तक्रार येथील ग्रामपंचायत सदस्य भरत हजारे यांनी केल्यानंतर ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांनी येथील कारभाराची सखोल चौकशी केली असता मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून आले.
त्यांनी या बाबत वरिष्ठांना कळविल्यानंतर वरिष्ठ तपासणी अधिकाऱ्यानी येथील कारभाराची चौकशी केली असता विविध खर्चात अनियमितपणा असल्याचे आढळून आले.


No comments:
Post a Comment