महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी/ अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनावाढीचा वेग कमी,
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा दावा ;
मृत्युदरही घटता......
मुंबई : महाराष्ट्राने कोरोनाचा सामना करण्यासाठी अतिशय गांभीर्याने आणि पारदर्शकपणे पावले उचलली आणि त्यामुळेच दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोनावाढीचा वेग किंवा मृत्युदर महाराष्ट्रात कमी आहे असे दिसते, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
२ फेब्रुवारी २०२१च्या आकडेवारीनुसार दर दशलक्ष लोकसंख्येत दिल्लीत ३७ हजार ८४४, गोव्यात ३६ हजार ७३२, पाँडेचरीत ३१ हजार ३५०, केरळमध्ये २८ हजार ८९, चंडीगडमध्ये १९ हजार ८७७ इतके रुग्ण होते.
त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी १६ हजार आठ रुग्ण होते.
महाराष्ट्राचा क्रमांक यामध्ये देशात सहावा होता.
महाराष्ट्राने वेळोवेळी आय.सी.एम.आर. आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्णसंख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत.
महाराष्ट्राच्या या प्रामाणिकतेचे आणि करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक आंतरराष्ट्रीय संस्थांनीदेखील केले आहे.
अगदी यासंदर्भातील माहिती अद्ययावत करताना पूर्वीचे जे मृत्यू कोरोनामुळे झाले होते, पण त्याची नोंद झाली नव्हती अशा सुमारे हजारभर मृत्यूंची नोंद पारदर्शकपणे करण्यात आली.
इतर काही राज्यांनी तर कोरोनाने मृत्यू झालेल्या, पण रक्तदाब, मधुमेह अशा सहव्याधी असलेले मृत्य हे करोना मृत्यू म्हणून नोंद केलेले नव्हते, इतकेच नाही तर केवळ कोरोना आहे, पण श्वसनाशी संबंधित लक्षणे नाहीत असे कोरोनाचे मृत्यू गृहीत धरले नाहीत.
एकूण मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात जास्त असली तरी दर दशलक्ष लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे.


No comments:
Post a Comment