सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - माढ्यात वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर- याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई उच्च न्यायालयाने माढा येथील न्यायालयात वरिष्ठ स्तर न्यायालय ( सिनिअर डिह्वीजन) मंजूर केल्याची माहिती माढा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. योगेश मुकणे यांनी VBP न्यूज सोबत बोलताना दिली आहे.
अॅड. मुकणे म्हणाले की माढा येथील न्यायालयात वरिष्ठ स्तर न्यायालयाबाबतचा मंजुरीचा प्रस्ताव उच्च न्यायालय,मुंबई यांनी महाराष्ट्र शासनाकडे पाठविलेला आहे, राज्यशासनाने यासंदर्भात तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर माढ्यात वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू होणार आहे. यासाठी पक्षकार व वकिलांना सध्या बार्शी येथे जावे लागते. यासाठी बराच वेळ खर्च करावा लागतो, माढा येथील न्यायालयात वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर केल्याने पक्षकारांची सोय होणार आहे. माढा येथील न्यायालयात सध्या एकूण चार कोर्ट कार्यान्वित आहेत. वरिष्ठ स्तर न्यायालय माढा येथे आल्यानंतर आणखी एका कोर्टाची भर पडणार आहे. तसेच वरिष्ठ स्तर न्यायालयामध्ये पाच लाख रकमेच्या मुल्यांकनांवरील दावे, वैवाहिक प्रकरणे, संपादित क्षेत्राबाबतचे दावे, व इतर दावे चालणार आहेत. माढा येथील न्यायालयात वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर करण्याबाबत माढा वकील संघाने विशेष प्रयत्न केले. वकील संघाचे अध्यक्ष अॅड. योगेश मुकणे, उपाध्यक्ष अनंत कुलकर्णी, सचिव दीपक सावंत, यांच्यासह वकील संघाच्या सदस्यांनी यासाठी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment