लेख ३ रा..
"शिक्षणमहर्षी कै.महाडिक तात्या..!"
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या
प्रचारसभेत मोडनिंब गावची ओळख करुन
देताना दोन व्यक्तींची नांवे मा.खा.शरद पवार साहेबांनी घेतली होती ती नांवे म्हणजे
कै.प्रभाकरपंत साठे व कै.महाडिक तात्या.
मोठ्या नेत्यांची ओळख आपण ठेवणे वेगळे
पण मोठी माणसं जेव्हा गाव पातळीवर
नेत्यांची ओळख सांगतात त्यावेळी त्यांचे मोठेपण वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.मोडनिंब संस्थानचे शिक्षणमंत्री,वकील
व श्री.उमाबाईसाहेब पटवर्धन स्मारक संस्थेचे दिर्घकाळ अध्यक्ष राहिलेले तात्या..
हा काळ फार मोठा म्हणजे १९५६ ते १९९१
जवळपास ३५ वर्षै..!
कै.तात्या म्हणजे ॲड.मारुतीराव हरीराव
महाडिक.. महाडिक घराणे मुळचे सातारा
जिल्ह्यातील निनाम पाडळीचे.परंतु गरीब
परिस्थितीने पुण्याला रोजीरोटीसाठी गेले.
पुण्यास तात्यांच्या वडिलांनी वैद्यकीय शिक्षण घेतले परंतु पुण्यासही जम न बसल्याने प्रथम करकंबला व नंतर हे कुटुंब मोडनिंबला स्थायिक झाले.तात्याचे वडिल
कै.हरिराव महाडिक वैद्यकीय व्यवसाय करत संस्थानच्या माध्यमातुन राजकारण
व समाजकारणात स्थिर झाले.श्री.उमा विद्यालयाच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता.परंतु कै.तात्यांनी चिकाटीने वकीलीचे शिक्षण पुर्ण केले व सन १९३६ सालापासुन वकीली करु लागले.आपोआप संस्थानचे कामही पाहु लागले व त्याच नात्याने तात्या संस्थानचे शिक्षणमंत्री झाले.
१९४९ साली झालेल्या लोकल बोर्डाच्या
निवडणुकीत तात्या निवडुन आले.सन
१९५२ साली ग्रामपंचायत स्थापन झाली व
त्यानंतर शेतकर्याचा आर्थिक कणा ठरलेली बृहत विकास सोसायटी स्थापन झाली यामध्येही तात्यांचा वाटा मोलाचा होता. तालुक्याला वकीली करत असतानाच
माढ्याचे नेते कै.गणपतराव साठे व काॅग्रेस
कमिटीच्या कामातही झोकुन दिले परंतु
बर्याच वेळा संधी येऊनही पक्षीय राजकारणापासुन तात्या दुर राहिले.परंतु
तात्यांची खरी कारकिर्द राहिली ती संस्थेचा
अध्यक्ष म्हणुन.मोडनिंबसारख्या ग्रामिण
भागात गोरगरीबांच्या मुलांना मोफत शिक्षण
मिळावे म्हणुन तात्या सदैव आग्रही राहिले.संस्थेच्या वाढीचा प्रस्ताव पुढे आल्यावर ही संस्था मोडनिंबपुरती मर्यादित
न ठेवता आसपासच्यारण,बावी,तुळशी,
,पिंपळनेर,व्होळे,वरवडे,रोपळे,शेटफळ या
गावांतील त्यावेळच्या मान्यवरांना बोलवुन
सभासदत्व दिले.खरंतर मनात आणलं असतं तर आजच्या शिक्षणसम्राटाप्रमाणे
तात्यांना संस्था मालकीची करता आली
असती परंतु हा मनाचा मोठेपणा तात्यांनी
दाखवला.शैक्षणिक कामात कधीही हस्तक्षेप न करता मुख्याध्यापकांना व
संस्थेतील इतर पदाधिकार्याना स्वातंत्र दिले.तात्यांची पाचही मुलांना आपल्या क्षेत्रात काम करण्याची मोकळीक दिली.
महत्वाचे म्हणजे तात्या नेहमी मोडनिंबच्या राजकारणाचे केंद्रबिंदु राहिले.
मोडनिंबला वरिष्ठ महाविद्यालय
होण्यासाठी खास प्रयत्न तात्यांनी केले व
या प्रयत्नांना तात्कालीन मुख्यमंत्री श्री.शरद
पवार साहेबांनी तात्यांच्या आग्रहाखातर
विनाअनुदान तत्वावर मान्यता दिली व
तात्यांच्या आग्रहावरुन मा.आ.बबनदादा
शिंदे यांनी मा.मनोहर जोशी मुख्यमंत्री
असताना महाविद्यालयाला अनुदानित दर्जा
प्राप्त झाला व खर्या अर्थानं मुलींसाठी
शिक्षणाची दारं खुली झाली,तात्यांचे हे योगदान न विसरता येण्यासारखे आहे म्हणुन संस्थेने महाविद्यालयाला तात्यांचे नांव देऊन ऋण व्यक्त केले.
शेकडो एकर जमिनीचा मालक असुनही
आयुष्यभर खादी कपड्यात तात्या वावरले.
वयाच्या ९० वर्षापर्यंत गांवात नियमित
फिरणारा हा माणुस मितभाषी होता,गर्व
कधी केला नाही व आयुष्यभर कितीतरी
कुटुंबाचा मार्गदर्शक राहिला.बर्याच कुटुंबात तात्यांचा शब्द अखेरचा असे कारण त्यात न्याय मिळण्याची खात्री होती.
परंतु कांही कर्मयोगी कमनशिबी असतात.
त्यामध्ये तात्या होते,त्यांचे काम,त्यांचे सर्व
क्षेत्रातल्या योगदानाची खरी किंमत किंवा
पोचपावती मिळाली नाही असं खेदाने
म्हणावसं वाटतं,परंतु एक मात्र नक्की ज्या
शिक्षण क्षेत्रातल्या योगदानाबद्दल तात्या
ओळखले जातात ते काम मोठे आहे.आज
शिक्षण सर्वदुर पोहचलंय पण ज्यावेळी शिक्षण मिळणं दुरापास्त होतं त्यावेळी
तात्यांनी जोपासलेला हा वटवृक्ष सर्वाना
शिक्षणाची सावली व फळ देऊन गेला व
हजारोंच्या जीवनात प्रकाश निर्माण झाला.
ही तात्यांची खरी ओळख..
"मरावे परी कीर्तीरुपी उरावे" ही म्हण खरी
झाली.तात्या वयाच्या ९६ व्या वर्षी हे जग
सोडुन गेले पण जाताना हजारो कुटुंबात
ज्ञानाचा दिवा लावायचे काम करुन गेले.
कै.तात्यांच्या कार्याला समस्त मोडनिंबकरांच्या वतीने सलाम...!
शब्दांकन..
जयवन्त समुद्र सर
मोडनिंब.
दि.२४ जानेवारी २०२२.
(सदर लेख प्रा.मोहन दत्तात्रय महाडिक यांच्या संमतीने प्रसारित करत आहे.)


No comments:
Post a Comment