" गेले ते दिवस,राहिल्या त्या आठवणी....!"
"साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा..
या संस्कृतीत वाढलेली पिढी.साधुसंताप्रमाणेच
चातकासारखी आम्ही दिवाळीची वाट बघायचो.
कारणही तसंच असायचे की,वर्षातुन हमखास
गणवेशाशिवाय वेगळ्या रंगाचे कपडे,फटाके
आणि महत्वाचे म्हणजे घरात होणारा फराळ,की
जो वर्षातुन एकदाच व्हायचा.त्याचं किती अप्रुप
असायचं,आकाशदिवा विकत घेणं न मानवणारं
मग घरोघरी कामट्या आणुन रंगीबेरंगी कागद
आणुन आकाशदिवा करण्याचा सामुहिक कार्यक्रम गल्लीत व्हायचा.तिरक्या गाठीला बांधुन टांगला जायचा,त्यात लाइट सोडण्याचे
भाग्य उशिरा मिळाले.झेंड्याप्रमाणे आकाशदिवा
खाली घेऊन पणती लावली जायची.हा कार्यक्रम
खरोखर मस्त असायचा,पणत्या लावायची लगबग असायची.गल्लीत खासकरुन शेतकरी
कुटुंबात पाच दिवस शेणाचे पांडव केले जायचे.
आणि हे आवर्जुन बघायचो पण त्यातील आशय समजत नसायचा,पण गल्लोगल्ली अगदी या
पांडवाचे राज्य मानाने असायचे व घरच्या
माऊलीची नजर चुकवुन टारगट कार्टी त्यातल्या
ठेरपोट्या पांडव्याच्या बेंंबीत फटाकडी लावुन
हमखास शिव्या खात असे,पण त्यातही मौज
असे.शिव्या असायच्या पण प्रेमानं,अरे थोडे वेळ तर राहुद्या त्यांना हा सल्ला असायचा.गल्लीत
मुलींचा एकमेकीच्या घरी रांगोळी काढण्याचा कार्यक्रम व्हायचा,यावेळी सगळ्या पोरांना
फटाकड्या वाजवायला बंदी असायची,आज
हे चित्र अजुनही खेडेगावात थोड्या प्रमाणात
आहे,शहरे मात्र फ्लॅट संस्कृतील हे सगळं मिस करताहेत.
फराळाची तयारी सामुहिक व्हायची.सोजीचा रवा,भाजणी,अनारशाचं पीठ,पाक करताना
गल्लीत त्या त्या क्षेत्रात तज्ञ असलेली आपलं ज्ञान मुक्तपणे वाटत असायची आणि मग रात्ररात्र जागुन घरोघरी फराळाचा स्वाद दरवळत
असे.त्या काळी डालडा तुप मिळणं म्हणजे
श्रीमंतीचं लक्षण मानायचं,कारण महाग असलेली ही वस्तु सहजासहजी मिळतही नसायची.मग दुरर्या दिवशी एकमेकाच्या घरी
फराळाच्या ताटाची देवघेव व्हायची,बघा बाई
तुमच्यासारखं जमलंय का?असं संभाषण व्हायचं.कांही ठिकाणी फराळाचेही कार्यक्रम
व्हायचे,हे स्नेहभोजन फार आनंदी असायचे..
आणि दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे
सगळ्यासाठी अप्रुप,कोण गल्लीत पहिल्यांदा
फटाकडी लावतोत यावर चुरस असायची,
घरातली माणसं आंघोळ करण्याआधी अंगाला
तेल लावुन ओवाळलं जायचं आणि मग बहिणीला अंग नीट चोळलं तरच भाऊबीज मिळेल अशी प्रेमळ धमकीही असायची,पण
सगळ्या बहिणी यांवर मात करायच्या आणि
म्हणायच्या तुझं प्रेम हीच भाऊबीज..असे संवाद
घरोघरी व्हायचे,पण ते तीन चार दिवस ३६५
दिवसातले सोनेरी दिवस असायचे,राजकोटचे
वासाचे तेल,वर्षात फक्त दिवाळीतच चांगला
वाटणारा मोती साबण व या दोन्हीचा वास घेतच
नविन कपडे घालुन वाटुन आलेल्या फटाकड्या
उडवण्याचा कार्यक्रम व्हायचा,ज्याची परिस्थीती
बरी आहे अशा घरी फटाके उडवताना बघायला
गर्दी व्हायची,रंगीबेरंगी फुलबाज्या फुटायच्या..
"दिन दिन दिवाळी,गाई म्हशी ववाळी,
गाई म्हशी कुणाच्या,लक्षुमणाच्या..
लक्षुमण कुणाचा..आईबापाचा...असं म्हणुन
फुलायची वर फेकली जायची.भुंगा,राॅकेट उडुन
कुणाचं माळवदावरलं गवत पेटलेलं असायचं
आणि ते विझवताना पळापळ व्हायची..पण
तोही आनंद वेगळाच..
आणि खर्या अर्थानं दिवाळीचा भावनिक दिवस
म्हणजे भाऊबीज...वर्षभरात कधीही न येणारी
घरोघरच्या लेकी आपल्या पिल्लांना घेऊन
आनंदाने माहेरी यायच्या आणि मग गल्लोगल्ली
हे भगिनीमंडळ आनंदात,उत्साहात आपल्या
मैत्रीणींची,गल्लीतल्या काकुंची,मावशीची,
आजीची,आत्याची अगदी स्नेहानं विचारपुस
करायची,भले सासरी कांहीही असो,माहेरी
सांगताना सगळं चांगलंच आहे हे सांगणं व
सहनशीलतेचं वागणं असायचं....
आणि हे दिवाळीचं चार दिवस भुर्रकन उडुन
जायचे,वडिलमाणसं आपल्या कामाधंद्याला
लागायची आणि मुलं गुरुजींना सांगितलेला
दिवाळीचा अभ्यास करण्यात गर्क व्हायची.
आज आम्ही या दिवाळीला मुकत चाललोय का?कारण आजच्याइतकी,सुबत्ता,संपन्नता,
विपुलता व उपलब्धता त्यावेळी नव्हती पण
मनामनात स्नेह होता,माया होती,जिव्हाळा होता
कुणाचंही उणंदुणं काढण्याची प्रवृत्ती नव्हती.
पण सगळं आहे,पण ज्यांच्या सहाय्याने हा
आनंद लुटायचे,ते शेजारी कुठं आहेत,मित्र
कुठं आहेत,स्नेही कुठं आहेत.हे सर्व आजही आहेत नाही असं नाही पण आम्हीच आमच्या
घराची,मनाची,ह्रदयाची कुंपणं घालुन घेतली आहेत.मग ती कुणाच्या अनुभवावरुन असो,
आर्थिक विषमतेतुन असो वा मी व माझं या भुमिकेतुन असो...
"आज दिवाळी आहे पण आनंद नाही."
" लाडु आहे पण गोडवा नाही.."
"खमंग चिवडा आहे,पण मिश्कील संभाषण नाही."
"चकली आहे पण आम्ही चक्रव्युहात आहोत"
"करंजी आहे पण सारणासारखे मिसळणे नाही"
"अनारसा आहे पण स्निग्धता नाही."
"आभाळात उडणारे फटाके आहेत,पण लवंगी
फटाक्याचा आनंद त्यात नाही.."
.. ऑनलाईन वस्तु घरी आल्या तशा आम्ही नातीही ऑनलाईन करुन टाकली..
खरंतर बोलण्यासारखं खुप आहे,पण हे
समजुन,उमजुन घेतलं तर आमच्या संस्कृतीनी
केलेली सणांची रचना किती उपयोगी होती,
माणुसपण जपणारी होती हे नक्की जाणवेल.
असु द्या काळ बदललाय,तसं आपल्यालाही
बदलावं लागतंय पण बदल करत असतानाही
तो संस्कृतीला सुसंगत असावा..तरच ही दिवाळी
खर्या अर्थानं आत बाहेर आम्हाला प्रज्वलीत
करेल एवढं नक्की..
"सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!
जयवन्त समुद्र सर,
मोडनिंब.


No comments:
Post a Comment