Breaking

Wednesday, 1 September 2021

मुंबई शहर प्रतिनिधी /विशाल खडके - ऐरोली चिंचपाडा येथील बायोगॅस आणी वीजनिर्मिती प्रकल्पाचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण.


ऐरोली चिंचपाडा येथील बायोगॅस आणि वीजनिर्मिती प्रकल्पाचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

 ऐरोलीतील विकासकामे मार्गी लावण्याला प्राधान्य देण्यात येणार असून शहराच्या  सर्वांगीण विकासासाठी जे जे करणं शक्य आहे ते करू, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ऐरोली येथे दिली. ऐरोली चिंचपाडा येथे तयार करण्यात आलेल्या नवीन बायोगॅस आणि वीजनिर्मिती प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात श्री. शिंदे बोलत होते. यावेळी दिघा गावातील भूखंडावर जलकुंभ उभारणी तसेच दिघा प्रभाग क्षेत्रात मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे टाकणे, मल:उदचन केंद्राच्या उभारणीचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार राजन विचारे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले उपस्थित होते. मल:उद्धचन केंद्रातील सेंद्रिय घनकचरा आणि सांडपाणी वापरून बायोगॅस आणि वीजनिर्मिती करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे दररोज 5 टन बायोगॅसची निर्मिती होणार असून तो चिंचपाडा परिसरातील नागरिकांना स्वयंपाकासाठी घरोघरी वितरित करण्यात येणार आहे. तर इथे तयार करण्यात आलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पातून दररोज 300 युनिट्सची वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. राजन विचारे यांचा खासदार निधी, माईंड स्पेस बिझनेस पार्क यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमातून हा प्रकल्प आकारास आला आहे. पालकमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नवी मुंबईत आकारास आलेला हा प्रकल्प अतिशय स्तुत्य असून राज्यात अशाप्रकारचा प्रकल्प उभा करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. हा प्रकल्प सर्वच महानगरपालिकासाठी पथदर्शी ठरेल.
त्यासोबतच नवी मुंबईतील अनेक रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण नगरविकास खात्याच्या माध्यमातून करत असून कोणत्याही काम यापुढे रखडू देणार नाही. नवनगराच्या उभारणीसाठी जे जे लागेल ते करण्याची ग्वाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली. याशिवाय कोविडची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता चिंचपाडा परिसरात उभारण्यात आलेल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे कोविड केंद्राचे लोकार्पण देखील त्यांच्याहस्ते यावेळी करण्यात आले. या कोविड केंद्रात ऑक्सिजन बेडस, आयसीयू बेडस, एनआयसीयू बेडस आणि लहान मुलांसाठी पेंडीयाट्रिक वॉर्डची देखील सोय करण्यात आली आहे. यावेळी या केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यातच कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत या गरीब वस्तीतील रुग्णांना रुग्णसेवा दिलेल्या डॉक्टर नर्सेस आणि आशा सेविकांना यावेळी श्री. शिंदे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. ऐरोलीमध्ये नव्याने तयार होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या कामाची पाहणी देखील श्री. शिंदे यांनी केली. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील निवडक प्रसंग या केंद्र शिल्पस्वरूपात उभारण्यात येणार आहे. त्यासोबतच डॉ. आंबेडकर यांच्या जीवनप्रवास चलचित्रफितीच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याची सोय देखील या केंद्रात  करण्यात यावी अशी सूचना श्री. शिंदे यांनी यावेळी केली. यावेळी माजी नगरसेवक नवीन गवते, शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, ममित चौगुले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment