Breaking

Saturday, 10 July 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- आषाढी वारीचे व्यवस्थित नियोजन करा...पालकमंत्री भरणे मामांच्या सूचना.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - आषाढी वारीचे व्यवस्थित नियोजन करा...पालकमंत्री भरणे मामांच्या सूचना- याबाबत वृत्त असे की सध्या कोरोना महामारीमुळे राज्य सरकारने दिलेले निर्देश व परंपरा यांचा समन्वय साधून आषाढी वारीचे व्यवस्थित नियोजन करा. यासाठी सर्व विभागांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. 

शुक्रवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आषाढी वारीच्या नियोजनाबाबत सर्व संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या संत तुकाराम भवन येथे बैठक पार पडली. 

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आ.प्रशांत परिचारक, आ.समाधान आवताडे, नगराध्यक्ष साधना भोसले, पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके आदी उपस्थित होते. 

सुरुवातीला सचिन ढोले यांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालखी सोहळे यांचे आगमन, शासकीय महापूजा, नगर प्रदक्षिणा आदीबाबतचे नियोजन सांगितले. 

पालकमंत्री भरणे म्हणाले, सर्व संबंधित विभागांनी नेमून दिलेल्या जबाबदार्या आणी कामकाज याबाबत पुढाकार घेऊन काम करावे. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास जिल्हा प्रशासन व मंदिर समिती यांच्याशी समन्वय ठेवून तोडगा काढावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन, आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांनी आपसात समन्वय ठेवून लसीकरण, स्वच्छता, आरोग्य तपासणी, शुद्ध पाण्याचा पुरवठा, आवश्यक ठिकाणी तात्पुरती स्वच्छता गृहे, वाखरी पालखी तळ स्वच्छता याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशा सूचना श्री. भरणे यांनी केल्या. यावेळी त्यांनी काही प्रतिनिधींच्या सूचना ऐकून घेतल्या. त्यावर संबंधित विभागांनी कार्यवाही करण्याच्या पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या. 

यावेळी कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, राज्य उत्पादन शुल्कचे रवींद्र आवळे, जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले, गटविकासाधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment