# CinemaGully
रेडिओशी संबंधित त्या भावमधुर आठवणींचा सुगंध आजही दरवळतोय.....शिवाजी विनायक नांगरे-
माझा जन्म १९६१ सालचा. मला आजही आठवतंय १९६७ साली माझे वडील सैन्यातुन आमच्या गावी म्हणजे किल्ले पारगडला दोन महिन्यांच्या सुट्टीवर आले होते. येताना त्यांनी फिलिप्स कंपनीचा व्हायकिंग अशा नावाचा रेडिओ आपल्या खांद्याला लटकवुन आणला होता. आम्हाला त्या रेडिओचं फारच अप्रूप वाटत होतं. मी असेन तेव्हा सहा वर्षांचा. रेडिओची ती चामड्याची केस त्यावर इंग्रजीत Viking असं लिहिलं होतं. अर्थात हा शब्द मला मी इयत्ता पाचवीत गेल्यानंतर नीट वाचता येवु लागला कारण इयत्ता पाचवी पासुन आम्हाला इंग्रजी विषय अभ्यासाला होता. त्या कमावलेल्या चामड्याच्या रेडिओ केसला एक विशिष्ट गंध येत असे आजही तो माझ्या अवती भोवती दरवळतोय असा मला आभास होतो. कोकणातील माझ्या घरी आजही तो रेडिओ आम्ही जपून ठेवलाय पण तो बंद अवस्थेत आहे.
तेव्हा सुट्टीवर आलेले माझे वडील पंधरा दिवसांतुन एकदा तो रेडिओ, लेदर केस मधुन बाहेर काढत व पिवळ्या मऊशार कापडानं तो पुसत. रेडिओच्या पाठीमागचं एक छोटं प्लास्टिक कव्हर काढून आतील आयताकृती ठोकळ्या सारखी एव्हरेड़ी कंपनीची लाल वेष्टणाची बॅटरी बाहेर काढून तीचं थ्री पीनचं कनेक्शन काढून ते पुन्हा तीला बसवून ते ती बॅटरी रेडिओत ढकलत. आम्ही मुलं हे सारं लांबुनच पहायचो कारण आम्ही बाबांना खूप घाबरायचो. त्यांनी नुसते डोळे वटारून जरी आमच्या कडे पाहिलं तरी आमची पाचावर धारण बसायची.
किल्ले पारगड या माझ्या गावी, गावातील विद्यामंदिरात इयत्ता पहिलीत मी तेव्हा शिकत होतो. माझी मोठी बहिण आणि चुलत भाऊ माझ्या सोबत शाळेत जात असत. माझे बाबा वर्षातुन एकदा मे आणि जुन अशी दोन महिन्यांची सुट्टी घेवुन येत. त्या काळी किल्ले पारगडच्या रहिवाशांची शेती ही डोंगर उतारावर व्हायची. नाचणी हे पिक तिथं घेतलं जाई. या शेतीशी संबंधित पूरक कामं करायला बाबा दर वर्षी या मोसमात सुट्टी वर यायचे. पावसाला सुरुवात झालेली असायची पेरणीची कामंहि आटोपलेली असत.
पावसाळ्याच्या या दिवसांत माझा गाव किल्ले पारगड दाट धुक्याच्या श्वेत वस्रात पूर्ण पणे लपेटुन गेलेला असे. पावसाची रीपरिप थांबायचं नाव घेत नसे. बाबा सकाळी लवकर साडेपाच- पावणे सहाला उठून रेडिओत मुंबई आकाशवाणी केंद्रावरील भक्ति गीतांचा कार्यक्रम लावायचे. त्या कार्यक्रमांतर्गत सुमधुर भक्ति गीतं माझ्या बाल मनाची पकड़ घेत. त्या गीतांनी माझ्या मनाची घेतलेली पकड़ आजही तशीच टिकून आहे. बाहेर थोडं अंधुक दिसतंय न दिसतंय आणि त्यात गुरफटुन गेलेलं प्रात:कालचं किल्ले पारगडचं ते आल्हाददायक वातावरण, गार वारा तर कधी वाऱ्याचं सोसाट्यानं वाहणारं रूप, रिमझिम बरसणारा पाऊस, घराघरांत खुराड्याखाली झाकलेल्या कोंबड्यांच्या आळीपाळीनं कानावर हळुवारपणे येवुन आदळणाऱ्या सुखावह बांगा,घरातील माणसांची शेताकड़े जायची लगबग अशा या माहोलात रेडिओ वरील प्रभात काळची भक्तिगीतं वातावरणाला एक वेगळीच खुमारी आणत.
मी अंथरुणात पडलेला असे आणि रेडिओ वरील त्या भक्तिगीतांनी चिंब भिजुन जायी.
" रात काळी घागर काळी" "अनंता अंत नको पाहू" " काय सांगु देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद म्हैशा मुखी बोलवीले" "कौशल्येचा राम बाई " "अमृताहुनी गोड नाम तुझे देवा " " अविरत ओठी घ्यावे नाम, श्रीराम जय राम जय जय राम " " पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये " " हेच ते हेच ते हेच ते हेच ते चरण अनंताचे " " धनु वाजे रुण झुणा वारा वाहे रुण झुणा " " ने मजशी ने परत मातृ भूमीला सागरा प्राण तळमळला " " देश हा देव असे माझा" " मला हे दत्तगुरु दिसले " " पूर्व दिशेला अरुण रथावर घट सोन्याचा विलसत सुंदर " " प्रभाती सुर नभी रंगती " " उठी श्रीरामा पहाट झाली " " श्री रामा घनशामा " "पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरी हरी हरी " " नारदा मुनीवरा कुठे मी गाता गौरव गीत, रंगले हरी भजनी संगीत " " पार्वती वेची बिलवदले " " गिरिजे ऐक सांगतो तुला " " तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता मी " " कोणी नसे कुणाचे सारे दयाघनाचे" " स्मरा स्मरा हो दत्त गुरु, दत्त गुरु भव ताप हरु " " करुणा निधान देवा " या अशा सुमधुर भक्ति गीतांनी माझ्या बालमनावर गारुड घातलं होतं. या गीतांतील लता दीदींनी म्हटलेलं भक्तिगीत "धनु वाजे रुणझुणा" यातील सुरुवातीची दीदींनी घेतलेली तान माझ्या हृदयात गोड संवेदना निर्माण करी आणि मी एका वेगळ्याच विश्वात हरवुन जायी. हे भक्तीगीत कानी पडलं की आजही मी माझ्या त्या बालविश्वात हरवून जातो.
किल्ले पारगडच्या त्या चिंब भिजलेल्या वातावरणात किलकिले डोळे करून मी अंथरुणातुनच बाहेर पहायचो. बाहेर सृष्टीचा अद् भुत खेळ रंगलेला असे. गार वारा आणि दाट धुकं यांच्या हातात हात घेतलेलं परंपरागत मैत्रीचं पर्व मनाला आणि तनुला कमालीचं सुख देत असे. अशा या मनमोहक वातावरणात रेडिओवरील भक्ति गीतांची ती शृंखला ती मांदियाळी कधी संपूच नये असं वाटे. त्यावेळचे ते लोकप्रिय गायक, चितळकर, गजानन वाटवे, बाबुजी म्हणजे सुधिर फड़के, मंगेशकर भगिनी, हृदयनाथ मंगेशकर, माणिक वर्मा,बकुळ पंडित, अरुण दाते, जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, छोटा गंधर्व, सुमन कल्याणपुर आदि प्रभृतींची त्यांच्या गायकिनं मला ओळख झाली अन् मी त्यांच्या गायकी पुढं नतमस्तक झालो.
आम्ही भावंडं सकाळी सात वाजता आंघोळ वगैरे उरकुन शाळेला जायचो. वाटेत त्या भक्ति गीतांच्या माझ्या मनावर मोहिनी घातलेल्या पंक्ति मी गुणगुणायचो. दुपारी बाहेरून घरी आल्या नंतर बाबा जेवण उरकुन वामकुक्षीसाठी आडवे होत. दिवसाही हुड हुडी थंडी त्यामुळे स्वतःला ते ब्लँकेट मध्ये लपेटुन घेत व जाड जुड़ अंथरुणात अंग झोकुन देत. त्यांच्या मनोरंजनाचा साथी रेडिओ त्यांच्या उशी शेजारी बाबांची साथ संगत करायला तत्पर असे. विविध भारतीवर त्यावेळची सुश्राव्य हिन्दी चित्रपट गीतं लागलेली असत. मी तेव्हा चिमुकला, उंबऱ्यावर बसुन दोन्ही हात हनुवटीला टेकवुन ती गाणी ऐकायचो. इथंच माझ्या मनात हिन्दी मराठी गाण्यांबद्दल अभिरुची निर्माण झाली आणि ती आजन्म टिकुन राहिली. आज ही सर्व गाणी माझ्या संग्रही आहेत ध्वनि मुद्रिकांच्या (सीडी) माध्यमातुन. दुपारच्या सत्रातील मला नविन असलेली पण मनाला गोडी लावणारी अशी ती हिन्दी गाणी आजही माझ्या स्मरणात आहेत ती त्यातील शब्द योजना आणि त्यांना लाभलेल्या अभिजात संगीतामुळे आणि गायकीमुळे. "मेरा प्यार भी तू है, यह बहार भी तू है " मुकेश आणि सुमन कल्याणपूर.
" दूरियाँ नजदीकियाँ बन गयी अजब इत्तिफ़ाक है " किशोर आणि आशा ताई भोसले. " मेरे मेहेबूब तुझे मेरी मुहब्बत की कसम " रफी आणि लता दीदी.
" आओ तुम्हे मैं प्यार शिखा दूँ , शिखला दो ना " रफी आणि लता दीदी. या गीतांनीही मला आजन्म आपल्या बंधनात अडकवुन टाकलं.
त्यावेळी रेडिओवर लागणाऱ्या मराठी चित्रपट गीतांचा महिमा काय तो वर्णावा! साऱ्यांचे कान रेडिओच्या दिशेनं टवकारलेले असत कारण रेडिओ हे एकच मनोरंजनाचं माध्यम तेव्हा उपलब्ध होतं. " मानसीचा चित्रकार तो " "ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु दे " "स्वराज्य तोरण चढ़े गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पड़ते पुढे " "प्रेमा काय देवु तुला, भाग्य दिले तू मला " या आणि अशा कितीतरी अविट गोडीच्या गाण्यांनी आबाल वृद्धांना अक्षरशः वेड लावलं होतं.
किल्ले पारगडवर आमच्या राहत्या घराच्या खालच्या बाजुच्या वाटेवर श्री. अण्णा कुबल काकांचं घर होतं. माझे बाबा आपली सुट्टी संपल्यावर रेडिओ आपल्यासोबत पुन्हा घेवुन जात त्यामुळे घर रेडिओ विना सुनं सुनं होई पण अण्णा काकांचा रेडिओ ही कसर भरून काढत असे. "अण्णाचा रेडवा लागला " अशी आसपासच्या घराघरांत आनंदातिशयानं होणारी चर्चा रेडिओ विषयीची प्रत्येकाला असलेली आत्यंतिक ओढ अधोरेखीत करी. त्या काळी गावात कोणी सुट्टीवर आला की स्वतः सोबत त्यानं आणलेला रेडिओ घेवुन त्यावर गाणी लावुन तो गावात फेर फटका मारायचा. आम्ही त्याचं ते रेडिओ खाकोटीला मारुन घराघरांना भेटी देत फ़िरणं कुतुहलानं पहायचो. एखाद्या घरी जावुन तो बसल्यानंतर रेडिओतील ती सुमधुर गाणी आणि गप्पाटप्पा यांचा एक आगळा वेगळा मिलाफ मनामनाला हरखुन टाकत असे.
पण आज ही रेडिओची जादू ओसरली आहे असं जड़ अंत:करणानं म्हणावं लागतंय. दूरदर्शन संचानं घराघरांत प्रवेश केल्यामुळे रेडिओ अडगळीत जावुन पडला. खासगी दूर चित्र वाहिन्यांच्या प्राबल्यानं रेडिओची घुसमट झाली. इकडे तिकडे पसरलेल्या केबलच्या जाळ्यानं रेडिओवर स्टेशन्स आपल्या मुळ चांगल्या सुस्पष्ट आवाजात लागेनात. आकाशवाणी केंद्र सिलोन ज्यानं बिनाका गीतमाला आणि निवेदक अमीन सयानी यांना घराघरांत पोहोचवलं ते सिलोन केंद्र आज कुठंतरी हरवलं.
विविध भारतीवरील सकाळचा साज और आवाज, दुपारच्या प्रहराचा मन चाहे गीत, अडीच वाजताचा लोकसंगीत या कार्यक्रमाची हवीहवीशी वाटणारी लोकजागराची सुरेख धुन ऐकायला कान आज आतुरलेले आहेत. ते मंतरलेले दिवस होते रविवारी दुपारी तीन वाजता "फौजी भाईयोंके लिए" विशेष जयमाला कार्यक्रम हिन्दी चित्रपट सृष्टितील एखादी हस्ती सादर करत असे. आज मात्र या कार्यक्रमाला नाईलाजानं मुकावं लागलंय. रोजचा सायंकाळचा सात वाजताचा जयमाला हा कार्यक्रम, गाने नये पुराने, हास्य नाटिका,रात्री दहाचा छायागीत,रात्री साडे दहाचा आपकी पसंद, उत्तर रात्रीचा बेला के फूल हे सारे कार्यक्रम आज सुरम्य आठवणी बनुन राहीले आहेत.
रेडिओ केंद्रावरील कार्यक्रमाचं निवेदन करणाऱ्या निवेदक निवेदिकांचा मधाळ आवाज मनामनाची आजही साथसंगत करत असतो, मनामनात गुंजत असतो. त्यावेळचा रात्र प्रहराचा तो नीरव वातावरणाचा माहोल आणि शेरशायरीचा आधार घेत निवेदकानं गाण्यांच्या कार्यक्रमाचं केलेलं सूत्र संचालन असा तो जमुन आलेला दुग्ध शर्करा योग होता असं मला वाटतं. तो मधाळ आवाजाचा करिश्मा श्रवण करायला कर्णेंद्रियं,तन आणि मन आतुरलेली असत.
विविध भारती मुंबईच्या विज्ञापन प्रसारण सेवा आकाशवाणी केंद्रावरील सुश्राव्य जाहिरातीही मनाला विलक्षण भावत ज्या आम्ही आजही गुणगुणतो. संध्याकाळचा सव्वा सहाचा कार्यक्रम, सांज गीत हा मराठी भावगीत, गझल,चित्रपट गीतं, सुगम संगीताचा कार्यक्रम मनामनावर आपल्या मोहिनीचं जाळं टाकुन होता. या कार्यक्रमांतर्गत "अनाम वीरा" ही कविता लता दीदींच्या आवाजात किंवा त्यांच्याच आवाजातील "मी डोलकर, डोलकर डोलकर दर्याचा राजा " हे कोळीगीत ऐकताना किंवा महमद रफिंचं " प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रूसा, हसा मुलांनो हसा." या आणि अशा गाण्यांनी कार्यक्रमाच्या लोकप्रियतेची पताका सदैव फडकवत ठेवली.


No comments:
Post a Comment