*कोरोनाची तिसरी लाट येवो ना येवो जिल्ह्यातील सर्व बालके सुरक्षित राहणे गरजेचे आहे. सीईओ दिलीप स्वामी...*
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पुर्वतयारी अंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणीबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविणे साठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ शितलकुमार जाधव जिल्हा आरोग्य अधिकारी, संजय राठोड शिक्षणाधिकारी प्राथमिक, जावेद शेख उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण, डॉ. प्रदीप ढेले जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.वैशाली शिरशेट्टी, डॉ.चाफळकर, डॉ.संदिप कुलकर्णी बालरोगतज्ञ, डॉ अतुल कुलकर्णी बालरोगतज्ञ, डॉ.अनिरुद्ध पिंपळे जिल्हा लसीकरण अधिकारी, डॉ. संतोष जोगदंड सहाय्यक संचालक कृष्ठरोग, राहूल देसाई गटविकास अधिकारी दक्षिण सोलापूर, जस्मिन शेख गटविकास अधिकारी उत्तर सोलापूर, डॉ. श्रीकांत कुलकर्णी तालुका आरोग्य अधिकारी उत्तर सोलापूर, डॉ दिगंबर गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी दक्षिण सोलापूर, डॉ मोहन शेगर निवासी वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. सदर प्रशिक्षण हे ऑनलाइन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व सोलापूर महापालिकेच्या बाल स्वास्थ कार्यक्रमतील निवडक अधिकारी प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले होते. उर्वरित तालुक्यातील गटविकास अधिकारी, बालविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमतील वैद्यकीय अधिकारी हे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे प्रशिक्षणास हजर होते.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. कोरोनाची तिसरी लाट येवो न येवो बालकांना सुरक्षित करणे आवश्यक आहे. यासाठी बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी कालबद्ध कार्यक्रम दिनांक 10 जून 2021 पासून हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी सीईओ स्वामी यांनी सांगितले. प्रशिक्षणाचा उद्देश सांगताना सीईओ स्वामी म्हणाले की सर्वच डॉक्टर बाल रोग तज्ञ नाहीत, त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी यांचे ज्ञान अद्यावत होण्यासाठी या प्रशिक्षणाची गरज वाटली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा तज्ञांनी अंदाज व्यक्त केला असला तरी त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. आजच्या प्रशिक्षणातून अधिकाऱ्यांनी आपले ज्ञान अद्ययावत करून प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी काम करणाऱ्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावे. गटशिक्षणाधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी शिक्षक व अंगणवाडी सेविकांना याचे प्रशिक्षण द्यावे. सर्वांना प्रशिक्षित करून कोविड प्रोटोकॉल नुसार सर्व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. अशा सूचना यावेळी सीईओ स्वामी यांनी दिल्या. यावेळी सोलापुरातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. अतुल कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांना बालकांच्या आरोग्य तपासणी बाबत मार्गदर्शन केले.


No comments:
Post a Comment