आदरणीय बाई
- आज ऑनलाईन शाळेचा पहिला दिवस. दुर्दैवाने 'ऑनलाईन' हा शब्द चिमुकल्यांच्या जिवनात शाळांच्या 'ऑफलाईन' पद्धतीमुळे आला याची मनाला थोडी खंतच वाटते. पण म्हणतात ना, निसर्गापुढे मानवाचं काही चालत नसतं. त्यामुळे निसर्गाच्या 'कोव्हिड - १९' च्या संकटापुढे जगाने हात टेकले तिथं तुम्ही आम्ही काय करणार..? मात्र खंबीरपणे या उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करुन आपल्या सर्वांना पुढे जायचे आहे. आणि म्हणून या शाळेच्या पहिल्या दिवशी नव्या उत्साहानं अन् तितक्याच आनंदानं मी आमच्या चिमुकल्यांच्या गुरुवर्य स्मिता लामतुरे मॅडम, सर्व विद्यार्थी व पालकांचे यानिमित्ताने शब्दरुपी सुमनांने मन:पुर्वक स्वागत करतो.
खरंतर रांगुन घरदार मिरवणारी, बोबडं तोतरं बोलुन मनोरंजन करणारी आमची चिमुकली कधी मोठी झाली हे लक्षातच आलं नाही. आज त्या चिमुकल्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे हे देखील नसे थोडके. त्यांच्यावर शिक्षणाचं ओझं नव्हे तर पुढील आयुष्याची जबाबदारी आजपासून खऱ्या अर्थाने पडणार आहे. म्हणतात ना मुल म्हणजे चिखलाचा गोळा असतो तो ओला असतानाच त्याला हवा तसा आकार देता येतो. त्याच्यावर पाहिजे तसे नक्षीकाम करता येते. त्याला घडवता येतं. आदरणीय बाई, हा चिखलाचा गोळा आम्ही आज मोठ्या विश्वासाने तुमच्याकडे सुपूर्द केला आहे. 'त्या' चिखलाला अर्थात बालमनाला चांगला आकार द्याल, तो मजबुत घडवाल, त्याला आयुष्यभर पुरेल अशी नक्षीकामाची शिदोरी द्याल या देखील अपेक्षा आम्ही सर्व पालक करतो.
मुळात इंग्रजी माध्यमापेक्षा आमचा मराठी अर्थात जिल्हा परिषद शाळांवर प्रचंड विश्वास. कारण जगात कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याचं सामर्थ्य फक्त जिल्हा परिषद शाळेच्या मातीत, प्रांगणात अन् खडु फळ्यात मिळतं हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नाही. तिथल्या आपुलकीच्या भिंती मुलांच्या पंखात आत्मविश्वाचं बळ भरतात अन् महत्वाचं म्हणजे तिथले गुरुजन त्यांच्या पुढील आयुष्याचा पाया भरभक्कम करतात.
आदरणीय बाई, लहान मुलं ही अनुकरणप्रिय असतात. परिसरात, निसर्गात, घरात आणि शाळेत घडणाऱ्या प्रत्येक घटनांना डोळ्यांच्या कॅमेरातुन बुद्धीच्या मेमरी मध्ये सेव्ह करत असतात. दुर्दैवाने आज कोरोनामुळे हि चिमुकली पुर्णवेळ जरी घरी असली तरी उद्या परवा ती शाळेमध्ये आपल्या सानिध्यात सर्वाधिक वेळ घालवणार आहेत. त्यामुळे त्याला शिक्षणाबरोबर त्याच्या बुद्धीला जगातील व्यावहारिक ज्ञान मिळणे गरजेचे आहे. मुलांच्या बौद्धिक विकासासोबत त्यांचा शारीरिक विकास देखील तितकाच महत्वाचा आहे. म्हणून मैदानातील शिक्षण देखील त्यांना द्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये सांघिक भावना व जिंकण्याची जिद्द पैदा होईल.
बाई, एक पालक म्हणून खरंतर खुप अपेक्षा ठेवतोय तुमच्याकडुन हे कळतंय मला देखील. मात्र तुम्ही जितकी जबाबदारी घेताय तितकी आम्ही घेवु मुलांची अन् शाळेची देखील. शाळेचा अंतर्रंग व बाह्यांग सुधारण्यासाठी आम्ही देखील आमच्या परिने खारीचा वाटा उचलु. ज्या शाळेत आपली मुलं ६-७ तास थांबणार आहेत ती शाळा सुधारित आहेच मात्र यापेक्षा आणखी देखणं रूप कसं देता येईल यासाठी तळमळीने प्रयत्न करु. धन्यवाद..!
आपला विश्वासु
सुहास घोडके
पालक
( संस्कार व संस्कृती)


No comments:
Post a Comment