स्मार्ट विकासाच्या कोंडीतील प्रभाग....
पुणे : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत विकास कामे सर्वांत पहिल्या औंध-बाणेर परिसरात सुरू करण्यात आली.
मात्र औंध-बोपोडी प्रभागातील बोपोडी परिसर या विकास कामांपासून वंचितच राहिला.
वाहतूककोंडी, पाणीपुरवठ्यातील अनियमितता, सांडपाणी वाहिन्यांचा अभाव तसेच कचऱ्यामुळे होणारी अस्वच्छता, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव अशा समस्या औंध-बोपोडीच्या या प्रभाग क्रमांक ८ मध्ये कायम असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे हा प्रभाग स्मार्ट विकासाच्या कोंडीत अडकल्याची वस्तुस्थिती आहे.
पुण्याच्या पश्चिमेकडील संपन्न भाग असलेले औंध आणि त्या पुढे झोपडपट्टीसह मिश्र वस्ती असलेला बोपोडी परिसर मिळून औंध-बोपोडी हा प्रभाग क्रमांक ८ तयार झाला आहे.
या प्रभागात सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, प्रकाश ढोरे हे नगरसेवक भा.ज.पा.चे आहेत.
विजय शेवाळे यांचे निधन झाल्याने त्यांची जागा रिक्त आहे.
झोपडपट्टी, गावठाण, सोसायट्या, बंगले अशा सर्व आर्थिक, सामाजिक स्तरातील नागरिक या प्रभागात राहतात.
पायाभूत सुविधांची कामे करणे ही नगरसेवकांची जबाबदारीच आहे.
त्यामुळे मैलापाणी वाहिन्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची वाहिनी, रस्त्यांची डागडुजी आदी कामे होत असतात.
पण पूर्वी सुरू केलेले प्रकल्पही पूर्ण होणे आवश्यक होते, ती कामे पूर्ण झालेली नाहीत.
स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत विकसित झालेला काही भाग आणि या विकासाचा मागमूसही नसलेला भाग असा विरोधाभास या प्रभागात दिसून येतो.
मुंबई-पुणे रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही.
तसेच ब्रेमेन चौक, परिहार चौकात नेहमीच वाहतूक कोंडी, गर्दी होत असते.
त्यामुळे या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोपवण्यासाठी समतल विभाजक (ग्रेड सेपरेटर) होण्याची आवश्यकता होती.


No comments:
Post a Comment