कचरा व्यवस्थापनासाठी ‘स्वच्छ’लाच पाठिंबा,
एकशेदहा नगरसेवक,
हजारो नागरिकांकडून कामाबाबत समाधान....
पुणे : घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे काम करणाऱ्या स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे काम काढून घेण्याचा घाट
महापालिकेने घातल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवक आणि हजारो नागरिकांनी स्वच्छ करत असलेल्या कचरा व्यवस्थापनाच्या कामाला पाठिंबा दर्शविला आहे.
प्रस्तावित खासगी संस्थेऐवजी कचरावेचकांच्या ‘स्वच्छ’ संस्थेचे काम सुरू ठेवावे, असे पाठिंबा दर्शविणारे पत्र ११० सर्वपक्षीय नगरसेवकांनी दिले आहे.
तर शहरातील ६ लाख ६२ हजार ९७८ मिळकतींमधील ३३ लाख १४ हजार ९८० नागरिकांनीही स्वच्छ संस्थेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
सर्वपक्षीय ११० नगरसेवकांची पाठिंबा पत्रे आणि नागरिकांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करणाऱ्या स्वाक्षरी असलेला तब्बल २५ हजार पानांचा अहवाल कचरावेचक संचालक मंडळाने महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिला.
सभागृहनेता गणेश बीडकर यांचीही शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली.
नगरसेवक, स्वच्छचे पदाधिकारी आणि महापालिका अधिकारी यांची बैठक घेतली जाईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून ‘स्वच्छ’च्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.
कचरावेचकांची सहकारी संस्था असलेल्या ‘स्वच्छ’कडील कचरा व्यवस्थापनाचे काम काढून घेण्याचा आणि हे काम खासगी ठेके दाराला देण्याचा घाट महापालिकेने घातला होता.
काही नगरसेवकांनी स्वच्छ संस्थेच्या कामाबाबत सातत्याने तक्रारी केल्यामुळे स्वच्छ आणि महापालिका यांच्यातील करार संपुष्टात आल्यानंतर खासगी
ठेकेदारांना काम देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला होता.
त्याचे तीव्र पडसाद उमटले होते.
स्वच्छच्या कचरासेवकांनी या निर्णयाला विरोध दर्शविला होता.


No comments:
Post a Comment