सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांची जिंजी किल्यास भेट- याबाबत सविस्तर वृत्त असे की स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या जिंजी किल्ल्यास खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भेट दिली. यावेळी चि. शहाजीराजे सुध्दा सोबत होते.
छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना महाराजांनी जिंजी किल्ल्यावर ताबा मिळवला. पूर्वी असलेला किल्ला पाडून नव्याने महाराजांंनी हा किल्ला बांधून घेतला. आज या किल्ल्यास अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने भेट देता आली.
मराठ्यांच्या इतिहासात दुर्गराज रायगड ला जितकं महत्व आहे तितकंच महत्व जिंजीच्या किल्ल्याला सुध्दा आहे. शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. छत्रपती संभाजी महाराजांना पकडून छळ करुन मारण्यात आले. त्यावेळी स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले आणि तिथून राज्यकारभार पाहू लागले. राजाराम महाराजांनी ८वर्षे या गडावरुन राज्यकारभार पाहीला.यामुळे औरंगजेबाला आपले निम्मे सैन्य दक्षिणेकडे पाठवावे लागले. परिणामी स्वराज्यावरील मुघल सैन्याचा दबाव कमी झाला व मराठ्यांनी गेलेले किल्ले व प्रदेश पुन्हा जिंकून घेतले.
जिंजीसारखा अभेद्य किल्ला पाहताना महाराजांच्या दूरदृष्टीची जाणीव पदोपदी होत होती. पूर्वी या ठिकाणी कृष्णगिरी, राजगिरी, चंद्रयान दुर्ग (चंद्रगिरी) हे वेगवेगळे तीन किल्ले होते ; तिथे संरक्षणाच्या दृष्टीने तटबंदी बांधून तिघांचा मिळून एक किल्ला शिवाजी महाराजांनी केला.
जिंजी किल्ल्याचे दुर्गमत्त्व त्याच्या नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती वरुन कळतेच पण त्याच बरोबर उपलब्ध परिस्थितीचा पुरेपूर विचार करण्यात आला आहे. लष्करी वास्तुशास्त्रीय बाबींचा सखोल विचार करून तटबंदीची शृंखला, निर्माण केली. आजही साधारणतः ११किलोमीटर लांबीची तटबंदी आपल्याला पहायला मिळते. तसेच टेहाळणी बुरुज, खंदक, राहण्याच्या जागा, पावसाच्या पाण्याचे नियोजनासाठीचे तलाव व टाके, पाण्याच्या टाक्यांचा संरक्षणदृष्टया वापर अतिशय खुबीने केलेला आहे. यामुळे हा किल्ला अधिकच अभेद्य बनला.
वास्तूशास्त्र व युध्दशास्त्राच्या दृष्टीने #जिंजी हा उत्कृष्ट असा किल्ला आहे.


No comments:
Post a Comment