Breaking

Monday, 15 November 2021

संपादक/ विजयकुमार परबत- देशरक्षणार्थ सैनिक कुटुंबाचे हौतात्म्य.


देशरक्षणार्थ सैनिक कुटुंबियांचे हौताम्य!
    काल मणिपूर येथे झालेल्या छुप्या अतिरेकी हल्ल्यात आसाम रायफल्सच्या खुगा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी साहेब, त्यांची पत्नी अनुजा ताई  आणि सात वर्षांचा बाळ अबीर आणि इतर चार सैनिक यांना हौताम्य प्राप्त झाले. सैनिकांच्या कुटुंबावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ असून अनुजाताई आणि बाळ अबीर यांच्या हौतात्म्याच्या वृत्ताने मनाला खूप वेदना झाल्या. कर्नल विप्लव त्रिपाठी साहेब जंगलातील फॉरवर्ड पोस्टला भेट देऊन कॅम्प मध्ये परतत असताना त्यांच्या ताफ्यावर आसाम लिबरेशन आर्मीच्या अतिरेक्यांनी रस्त्यात स्फोटकांचा स्फोट घडवून आणून आणि गोळीबार करून हा रक्तपात घडवून आणला. समोरासमोरच्या लढाईत भारतीय सैनिक कधीच हार मानत नाहीत, परंतू छुप्या,भ्याड हल्ल्यापुढे नाईलाज झाला.  
   आसाम मध्ये येण्यापूर्वी मिझोराम मध्ये कर्नल त्रिपाठी यांनी अतिशय धाडसी कामगिरी बजावत असताना अतिरेक्यांमध्ये घबराट पसरवली होती,त्यामुळे गेली चार वर्ष त्या भागात अतिरेकी कारवाया पूर्णत: थंडावल्या होत्या, भारत-म्यानमार दरम्यानचा अंमली पदार्थ,शस्त्रास्त्रे यांचा चोरटा व्यापार बंद झाला होता. जुलै २०२१ मध्ये आसाम मध्ये नियुक्त झालेल्या कर्नल विप्लव त्रिपाठी साहेब हे उत्कृष्ट नेतृत्व,कारवाईतील वैय्यक्तिक सहभाग, स्थानिकांशी जिव्हाळ्याचा संपर्क असणे या गुणांसाठी आणि विशेषत: जवानांच्या जीवाला जीव देणारे अत्यंत धाडसी अधिकारी म्हणून परिचित होते.
    कर्नल विप्लव त्रिपाठी साहेबांनी स्वातंत्र्यसैनिक असलेल्या आपल्या आजोबांकडून देशसेवेची प्रेरणा घेत सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा धाकटा भाऊही सैन्यात अधिकारी आहे. त्यांचे पिता पत्रकार असून मातोश्री सामाजिक कार्यकर्त्या आहेत. 
    कर्नल विप्लव त्रिपाठी साहेबांनी भारतासाठी केलेले काम अतुलनीय असेच आहे. त्यांच्या पत्नीचा आणि लहान मुलाचा या हल्ल्यात अंत होणे, हे केवळ दुर्दैवी आहे. पाकिस्तान,चीन एवढे केवळ दोनच आपले शत्रू नसून अंतर्गत शत्रूंचा फार मोठा उपद्रव आपल्या देशाला सहन करावा लागतो. यातही आपले अनेक सैनिक हुतात्मा होत असतात, याबद्दलही सामान्य जनतेला माहिती असली पाहिजे.  भारतीय सैनिकच नव्हे तर त्यांचे कुटुंबीयही आपला देश सुरक्षित राहावा यासाठी खूप त्याग करत असतात, हे ध्यानात घेतले पाहिजे. या सर्व हुताम्यांच्या आत्म्यास सदगती लाभावी, म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूयात. बाल-हुतात्मा अबीर साठी विशेष प्रार्थना! आजच्या बालदिनी आपल्या मुलांना याबद्दल जरूर माहिती द्या! जय हिंद!

No comments:

Post a Comment