*ओला दुष्काळ जाहीर करा ; हेक्टरी सरसकट ५० हजार द्या-भाजप नेते रमेशराव आडसकर यांची मागणी*
================
माजलगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आतापर्यंत सात वेळा अतिवृष्टी झाली आहे.अगोदर कोरड्या दिवसांमुळे आणि आता अतिवृष्टीमुळे पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे.बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयांची भरपाई शासनाने द्यावी,अशी मागणी भाजपचे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी केली आहे.
रमेशराव आडसकर म्हणाले की,यंदा अगोदरच शेतकरी कोरोना लॉकडाऊनमुळे अडचणीत आला.त्यात पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही विमा कंपनीने शेतकऱ्यांना विमा भरपाईची अग्रीम रक्कम दिली नाही.त्यात पुन्हा ऑगस्टच्या शेवटी आणि दिनांक चार ते सात सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजविला.त्यामुळे सोयाबीन,कपाशी,बाजरी,ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले.नद्यांना पुर आल्याने जमिनी वाहून गेल्या.अनेक ठिकाणी जीवीतहानीही झाली.माजलगाव,धारूर व वडवणी तालुक्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान केले.आता त्यातून काही उरलेले खरीप पिके दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने पूर्ण हातातून गेली आहेत.काढून टाकलेले सोयाबीन कुजून गेले आहे.कपाशी पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.अशा कठीण काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.केवळ पंचनाम्यांचा फार्स करू नये.सर्वत्रच मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी,अशी मागणीही रमेशराव आडसकर यांनी केली.


No comments:
Post a Comment