देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या हेल्पलाइनची जनजागृती करण्यासाठी जनसेवा फाउंडेशन मार्फत ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ पुणे प्रादेशिक विभागाचे सचिव हनुमंत कुंभार यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगाने वाढत आहे. त्या प्रमाणात ग्रामीण आणि शहरी भागातील जेष्ठांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी , त्यांच्या गरजा भागविण्यासाठी व समस्यांचे निवारण करण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सर्व राज्यात सुरू करण्यात येत आहे. सदरची हेल्पलाइन राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त सहकार्याने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकासाठी ही हेल्पलाईन जनसेवा फाउंडेशन तर्फे चालवली जाणार आहे.
राष्ट्रीय हेल्पलाइनची ज्येष्ठ नागरिकांमध्ये जागृती होण्यासाठी जनसेवा फाउंडेशन च्या माध्यमातून सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद यांचेसाठी या जिल्ह्याचे क्षेत्रीय अधिकारी प्रज्ञावंत रणदिवे यांनी ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत जनसेवा फाउंडेशन कडून प्रकल्प व्यवस्थापक स्मीतेश शहा यांनी संस्थेची व राष्ट्रीय हेल्पलाइनची ओळख करून दिली. गटप्रमुख हनुमंत धुमाळ यांनी हेल्पलाइनची ध्येय धोरण व उद्दिष्टे तर रेखा आनंद यानी हेल्पलाइनची कार्यप्रणाली याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष चंद्रकांत महामुनी व सचिव हनुमंत कुंभार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी फेस्कॉम व जनसेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्यामध्ये संयुक्तपणे काम करतील. हेल्पलाइनची उपयुक्तता व गरज याबाबत ज्येष्ठ नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी ग्रामीण भागात जेष्ठ नागरिक संघाची फार मोठी व महत्त्वाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील शांतिनाथ सावंत, दिलीप पवार, आनंदराव शिंदे, महादेव माने, चंद्रकांत साळवेकर, गुरुलिंग कन्नुरकर, सौ आशा सलगर, सुरेखा कुलकर्णी, नंदा पवार, अरुण कदम, राजेंद्र माने, महादेव दिवटे, विजयकुमार शिंदे, गणेश व्यवहारे, यांनी चर्चेत भाग घेऊन संभाव्य समस्या मांडल्या. प्रास्ताविक व आभार प्रज्ञावंत रणदिवे यांनी केले.


No comments:
Post a Comment