दिनांक : 17/07/2021
प्रति ,
मा.जिल्हाधिकारी सो!
कोल्हापूर जिल्हा.
विषय : प्रशासनाचे काही नियम हे "रोगापेक्षा इलाज भयानक" असे चालू आहे.यावर निर्बंध आणून संबंधितांवर कारवाई करावी.
महोदय ,
आज वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी पाहिल्यावर प्रशासनाचे नियम म्हणजे "रोगापेक्षा इलाज भयंकर" म्हणायची वेळ आली आहे. सर्किट हाऊस चौकात निर्धारित वेळेचे उल्लंघन केले म्हणून एका चिरमुरे फुटाणे विकणाऱ्या फेरीवाल्याला महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक महिला अधिकारी यांनी ₹1000 /- ची रक्कम दंड म्हणून केली आणि तो दंड भरायला त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्याचे चिरमुरयाचे पोते जप्त केले.त्या व्यक्तीने दिवसभरात फक्त 70 रुपये मिळकत झाल्याचे सांगून ही त्याच्यावर ही विक्षिप्त कारवाई करण्यात आली आहे. गेले 3 महिने व्यवसाय बंद आहेत. थकीत कर्जाचे हफ्ते ,लाईट बिल , मुलांच्या शाळेच्या फी आणि रोजचा घरगुती खर्च हा कसा चालवायचा हा यक्ष प्रश्न समोर ठाकला असताना चोरी मोरी करून अथवा खंडणी मागून किंवा 2 नंबरचा व्यवसाय असा मार्ग न पत्करता , प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या व्यक्ती ,फेरीवाले ,दुकानदार यांच्यावर अशा प्रकारची जुलमी कारवाई जे अधिकारी करतात त्यांचा निषेध करावा तितका कमीच आहे.
सदर घटनेची बातमी आली म्हणून नजरेत येईल मात्र अशा अनेक घटना या वर्षभरात सामान्यांना अनुभवायला येत असतात.
कोल्हापुरात लॉकडाऊन काळात निर्बंध न पाळणाऱ्या नागरिक ,विक्रेते यांच्यावर कडक कारवाई वारंवार काही प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी ,पोलिस यांच्याकडून केली जात आहे .सदर योग्य कारवाई बाबत कोणतेही दुमत नाही. मात्र हे करत असताना गेल्या 3 महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे अनेक उद्घाटन समारंभ , सोहळे ,बैठक ,निदर्शने ,मोर्चे आदी नियमबाह्य पद्धतीने होत असताना तर लसीकरणाच्या ठिकाणी उडत असणारा सोशल डीस्टसिंगचा फज्जा हा अनुभवायला येत असताना यांसर्व प्रकारावर अपवादात्मक सोडता कोठेही कडक कारवाई होताना दिसत नाही.मात्र सर्वसामान्य चुकला तर तो पारंपरिक गुन्हेगार असल्या प्रमाणे त्याला वागणूक दिली जाते.काही पोलिस कर्मचाऱ्यांची भाषा ही उद्धट आणि अरेरावीची अनुभवायला येते. मग अशी भाषा आणि वागणूक आतापर्यंत घडलेल्या राजकीय कार्यक्रमाच्या ठिकाणी का दाखविली जात नाही ?
तरी आपण या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि इतर अधिकारी,पोलिस आणि कर्मचारी यांना सामान्य नागरिक ,विक्रेते यांच्या बरोबर सौजण्याने वागण्याबाबत कडक सूचना द्याव्यात ,ही नम्र विनंती.
आपला विश्वासू ,
श्री महेश रमाकांत उरसाल.
अध्यक्ष : श्री अंबाबाई (महालक्ष्मी) भक्त समिती कोल्हापूर
माहितीसाठी :
मा.आयुक्त सो!
कोल्हापूर शहर.
मा.पोलिस अधीक्षक सो!,
कोल्हापूर जिल्हा.


No comments:
Post a Comment