आराखड्यातील बदल वरळी बी.डी.डी. चाळीपुरताच ?
म्हाडा उपाध्यक्ष समितीचा अहवाल रखडला........
मुंबई : बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकास आराखड्यात सुचवलेल्या बदलामुळे अडीच हजार कोटी रुपयांनी खर्च वाढणार असल्याचे स्पष्ट होताच आता हा बदल फक्त वरळी बी.डी.डी. चाळींपुरताच मर्यादीत ठेवण्यात येणार असल्याचे कळते.
या घोळामुळेच म्हाडा उपाध्यक्षांच्या समितीकडून तीन दिवसांत सादर होणारा अहवाल चांगलाच रखडला आहे.
तो दोन-तीन दिवसांत सादर होण्याची शक्यता आहे.
वरळी बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकासासाठी टाटा समूहाला ११ हजार ७४४ कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे.
आराखड्यातील बदलामुळे एकट्या वरळीसाठी कंत्राटात आणखी दोन हजार कोटींची वाढ होणार आहे.
मात्र ही वाढ फक्त पाच टक्के इतकीच देता येईल, असे म्हाडाचे म्हणणे आहे.
त्यापोटी ५०० ते ६०० कोटी रुपये होणार आहे.
मात्र त्यात वाढीव काम होणार नाही, असे टाटा समूहाने स्पष्ट केले आहे.
आराखड्यातील बदलामुळे बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकासाचा खर्च दोन ते अडीच हजार कोटींनी वाढेल, असे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता‘ने (२० जानेवारी २०२१) दिले.
तेव्हापासून हा खर्च इतका वाढणार नाही, असे अहवालात दाखविण्यासाठी संबंधितांवर दबाव आणला जात आहे.
मात्र कमी खर्च होईल, असे स्पष्ट केले तर संबंधित कंत्राटदार ते मान्य करणार नाही, अशा द्विधा मन:स्थितीत सापडलेल्या म्हाडाला त्यामुळेच अहवालावर शिक्कामोर्तब करता आलेले नाही.
अखेरीस आता फक्त वरळी बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकासासाठीच फक्त आराखड्यातील बदल लागू करावा, असा निर्णय घेण्यात आल्याचे कळते.


No comments:
Post a Comment